नांदेड : दुष्काळी परिस्थितीत मायक्रो फायनान्सवाल्यांनी शेतकर्यांना अडवल्यास किंवा नडण्याचे काम केल्यास त्यांना आडवे करू, असा सुस्पष्ट इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिला. खाजगी वित्तीय संस्थेच्या वसुली जाचातून जिल्ह्यातील एका शेतकर्याचा अलीकडेच बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी हा इशारा देतानाच मयत शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांच्या कुटुंबास ५ लाखांची वैयक्तिक आर्थिक मदतही जाहीर केली.
शहराशेजारील वाडी (बु.) भागात नव्याने उभारण्यात आलेल्या १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खा.नागेश पाटील आष्टीकर, आ.बालाजी कल्याणकर व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे हे या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष होते; परंतु त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
शिंदे पुढे म्हणाले, दुष्काळाने होरपळत असलेल्या शेतकर्यांना शिवसेना बांधावर जाऊन मदत करणार आहे. लवकरच हदगाव येथे शिवसेनेच्या वतीने १०० लेकी-बाळींचे लग्न लाऊन देण्यात येणार आहेत. ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारावर चालणारी शिवसेना आहे. करतो-पाहतो म्हणणारी शिवसेना नाही, जिथे आपत्ती, संकट तिथे शिवसेना हे आमचे ब्रीदवाक्य आहे. विरोधक बळीराजा संकट असताना राजकारण करत आहेत.
ही वेळ शेतकर्यांना मदत करण्याची आहे. टीका न करता विरोधकांनी सूचना कराव्यात, असे नमूद करून शिंदे म्हणाले की, नांदेड जिल्ह्यात आगामी काळात जलसिंचन वाढवायचे आहे. यासाठी १४ हजार ४० कोटी रूपयांची ११ कामे मंजूर करण्यात आली आहेत. शेतकर्यांना दिलेली ५ हजारांची तातडीची (अग्रीम) मदत आहे. आणखी मदत दिली जाणार आहे. शेतकर्यांनी टोकाची भूमिका घेऊ नये, धीर सोडू नये असे आवाहनही शिंदे यांनी केले.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, या उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून जनतेला चांगली सुविधा मिळणार आहे. १०० खाटांऐवजी २०० खाटांची व्यवस्था करण्याची मागणी समोर आली आहे. त्याबाबत विचार केला जाईल. या रुग्णालयात सीटी स्कॅन व डायलिसीसची सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना देण्यात आली आहे.
थोडं प्रेम आमच्यावरही दाखवा-खा.अशोक चव्हाण
आपलं प्रेम बालाजीरावांवर जास्त आहे. आम्ही आपले जुने सहकारी आहोत. थोडं प्रेम इकडेही दाखवा आणि आमच्याकडेही लक्ष द्या. नांदेडमध्ये आणखी विकासकामे करता येतील. शेवटी राज्यात आपली युती आहे. आपण सर्वजण एकत्र काम करत आहोत. अशी अपेक्षा खा.अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यक्त केली.
शेतकरी कुटुंबास ५ लाखांची मदत
मुदखेड तालुक्यातील माळकौठा येथील मृत शेतकरी चंद्रकांत दगडूजी शिंदे यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ५ लाख रुपयांची वैयक्तिक आर्थिक मदत केली. शिंदे कुटुंबावर ओढावलेल्या दुःखद प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी मदतीचा हात देत कुटुंबाला आर्थिक आधार दिला.
