अहिल्यानगर : नेवासामधील घराणेशाही, गुंडगिरी व दडपशाही झुगारून द्या, चुकीच्या उमेदवारांना नामंजूर करा, असे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज, शुक्रवारी विरोधकांवर हल्ला चढवला.

नेवासा नगरपालिकेच्या निवडणुकीतील शिवसेना-भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ झालेल्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे, उद्योजक प्रभाकर शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब पवार, सचिन देसरडा, माऊली पेचे, अंकुश काळे, राजेंद्र मते, किसनराव गडाख आदींसह उमेदवार उपस्थित होते. नेवासा येथील सभेपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथेही प्रचार सभा घेतली.

लाडक्या बहिणींची महिन्याची ओवाळणी कधीही बंद होणार नाही, उलट त्यांना आम्ही आत्मनिर्भर करून लखपती करण्यासाठी नव्या योजना आणणार, याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला. ज्यांच्या पाठीशी महिला, त्यांचा नंबर पाहिला हे आता प्रत्येक निवडणुकीत सिद्ध होत आहे असा उल्लेख करून ते म्हणाले, कितीही अफवा पसरवल्या तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही शब्द पाळणारे कार्यकर्ते आहोत. सरकारच्या योजना कायमस्वरूपी आधार देणाऱ्या आहेत.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीची सत्ता असेल तरच शासन तुमच्या दारी येईल. नेवासा शहरातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. पाणी योजना, रस्ते, व्यापारी संकुल यासाठी निधी देऊ. सरकारी जमिनीवर वर्षानुवर्ष राहणाऱ्या नागरिकांना उतारे देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून ज्ञानेश्वर तीर्थक्षेत्र जागतिक पटलावर येण्यासाठी आपण सर्वतोपरी निधी देऊ, असेही आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नेवासा येथील सभेनंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोपरगाव येथेही प्रचार सभा घेतली तसेच शिर्डीमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार अमोल खताळ, आमदार लंघे, पदाधिकारी नितीन औताडे, अनिल शिंदे, सचिन जाधव आदी उपस्थित होते. अहिल्यानगर शहरातील माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळानेही त्यांची भेट घेतली. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरकडे रवाना झाले