परभणी : यापूर्वी राज्यात मराठा समाजाच्या नेत्यांचे सत्तेत प्राबल्य असताना समाजाचे निर्णय घेतले गेले नाहीत पण राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेण्यात आली आहे, इतर समाज घटकांचे आरक्षण काढून न घेता मराठा समाजाला जे हक्काचे आहे ते देण्याची भूमिका आमच्याच सरकारने घेतली असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केले.

येथील स्टेडियम मैदानावर खासदार संजय जाधव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी व युवा संवाद मेळाव्याच्या निमित्ताने शिंदे यांचे भाषण झाले. यावेळी खासदार संजय जाधव, खासदार संजय देशमुख, मंत्री आशिष जयस्वाल, आमदार सईद खान, शंकर धोंडगे, माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी महापौर प्रताप देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे, विशाल कदम, गंगाप्रसाद आणेराव आदी यावेळी उपस्थित होते.

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद सभास्थानी दिसून आले. खासदार जाधव यांनी प्रास्ताविकात मनोज जरांगे यांची माफी मागितल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही या विषयावर आपले भाष्य केले. हा मेळावा पूर्वनियोजित असल्याने तो रद्द होणे शक्य नव्हते. मात्र मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाबद्दलची तळमळ प्रामाणिक आहे. आपण स्वतः दोन वेळा त्या ठिकाणी गेलो आहोत. मंत्र्यांनाही चर्चेसाठी पाठवले आहे. इतरांचे कमी न करता मराठा समाजाला हक्काचे मिळावे हीच आपली भूमिका आहे असे यावेळी शिंदे म्हणाले.

मराठवाड्यात कृषी पूरक उद्योग निर्माण झाले पाहिजेत. त्यासाठीच्या पायाभूत सुविधा सरकार उपलब्ध करून देईल, शहराच्या विकासासाठी नवीन औद्योगिक वसाहत निर्माण केली जाईल. विकासासाठी भरीव निधी देण्याचे काम केले जाईल. कारण विकास हाच आमचा अजेंडा आहे. हे सरकार बळीराजाचे आहे. आपत्तीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले.

संजय जाधव हे धाडसी खासदार आहेत ते आता खऱ्या अर्थाने मूळ शिवसेनेत आले आहेत.२०२२ साली राज्यात खऱ्या अर्थाने उठाव झाला आणि शिवसेना भक्कम झाली. आता सहा खासदारांनी मूळ शिवसेनेत परतण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांची कास धरलेली आहे. विरोधात राहून विकास शक्य नाही. त्यामुळे वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर परभणीच्या जनतेसाठी खासदार जाधव यांनी हा निर्णय घेतल्याचे शिंदे म्हणाले. यावेळी मंत्री आशिष जयस्वाल, खासदार संजय जाधव आदींची भाषणे झाली. माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यासह विविध पक्षातून शिवसेनेत आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

सभास्थानी मराठा आंदोलकांची निदर्शने, काळे झेंडे

जाहीर सभेच्या ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलकांनी निदर्शने केली. ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत मेळावा रद्द करा अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. घोषणाबाजी करणाऱ्या या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सभेच्या ठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भाषणाला प्रारंभ झाल्यानंतर काही आंदोलनकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्यानंतर शिंदे यांनी या कार्यकर्त्यांना व्यासपीठाच्या जवळ यायला सांगितले. एकूणच आजच्या सभेवर मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर उद्भवलेल्या परिस्थितीचे सावट दिसून आले.