छत्रपती संभाजीनगर : लाडक्या बहिणींना लखपती करू तसेच लवकर त्यांना २१०० रुपये देऊ असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ज्या उमेदवाराच्या मागे महिला, त्याचा नंबर पहिला. त्यामुळे दर महिन्याला ओवाळणी देणारा हा भाऊ आज विनंती करायला आला आहे असे सांगत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतं देण्याचं आवाहन केले. जिल्हा परिषदेच्या देवगाव रंगारीमध्ये जाहीर सभेत ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, ’ जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका कार्यकर्त्यांच्या आहेत. पक्षाचा पाया रचणारी निवडणूक आहे. मी आज मी नेहमी सारखं भाषण करणार नाही. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडता येत नाही म्हणून अशा परिस्थितीत निवडणूक प्रचार करावा लागत आहे. यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अशा दुःखात देखील आम्हाला प्रचाराला यावे लागते. या निवडणुका लढवय्या कार्यकर्त्यांच्या असतात, त्या पुढे ढकलता येत नाहीत. त्यामुळेच आम्ही प्रचार साधेपणाने करतो, कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेतो असे शिंदे म्हणाले. या वेळी आमदार रमेश बोरनारे, आमदार संजना जाधव, खासदार संदीपान भुमरे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन राजेंद्र जंजाळ यांनी केले.
सभेस पाच तास उशीर
देवगाव रंगारी गटात भाजप विरुद्ध शिवसेना अशी युतीतील मित्र पक्षाची लढत होत असल्याने या गटावर यापुर्वी भाजपचे वर्चस्व रहिलेले आहे. त्यामुळे या सभेकडे स्थानिक मतदार वेगळ्या दृष्टीकोनातून पाहताना दिसून येत आहे. सुमारे चार ते पाच तास सभेला उशीर झाल्याने गावकऱ्यांना वाट पहावी लागली.

