scorecardresearch

मराठवाडय़ातील २३ नगरपंचायतींवर भाजप, राष्ट्रवादीचा वरचष्मा

मराठवाडय़ातील २३ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लातूरमध्ये भाजपला बसलेला फटका, नांदेडमध्ये कॉग्रेस कार्यकर्त्यांनी मिळविलेला विजय तसेच सत्ता असून नगरपंचायतीमध्ये प्रभावहीन ठरलेली शिवसेना, यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर मतदारसंघावर आमदारांची पकड अधोरेखित झाली.

lifestyle

नांदेडमध्ये काँग्रेसने गड राखला, शिवसेनेला मात्र दोन जिल्ह्यांत यश

औरंगाबाद : मराठवाडय़ातील २३ नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये लातूरमध्ये भाजपला बसलेला फटका, नांदेडमध्ये कॉग्रेस कार्यकर्त्यांनी मिळविलेला विजय तसेच सत्ता असून नगरपंचायतीमध्ये प्रभावहीन ठरलेली शिवसेना, यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीनंतर मतदारसंघावर आमदारांची पकड अधोरेखित झाली. नायगाव नगरपंचायतीमध्ये सर्वच्या सर्व १७ जागांवर विजय मिळवून देण्यात आमदार वसंत चव्हाण यांचा प्रभाव दिसून आला, तर आष्टी, पाटोदा, शिरुरकासार या नगरपंचायतीवर भाजपने यश मिळवले असले तरी त्यावर पंकजा मुंडे यांच्यापेक्षाही सुरेश धस यांचा प्रभाव असल्याचा दावा कार्यकर्ते करीत आहेत. मराठवाडय़ातील २३ पैकी भाजपला सहा, राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेसला प्रत्येकी पाच तर शिवसेनेला चार नगरपंचायतीवर सत्ता मिळविण्यात यश आले.

मराठवाडय़ात भाजपचे सर्वाधिक ९३ उमेदवार निवडून आले, त्यातील एक उमेदवार पुरस्कृत आहे. भाजपचे सर्वाधिक ३८ नगरसेवक बीड जिल्ह्यात निवडून आले. शिरुरकासार, आष्टी, पाटोदा या मतदारसंघात आमदार सुरेश धस यांच्या समर्थकांचे हे यश असल्याचे मानण्यात येत आहे. भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचेही ९२ उमेदवार निवडून आले. नांदेडमध्ये सर्वाधिक ३३ उमेदवार निवडून आले. काँग्रेसचे ८० उमेदवार निवडून आले. सत्तेतील शिवसेनेला मात्र ७६ जागांवरच समाधान मानवे लागले. लातूर जिल्ह्यात प्रहार आघाडीलाही यश मिळाले तर हिंगोलीमध्ये वंचित तर नांदेडमध्ये एमआयएमनेही तीन जागा मिळवत अस्तित्व टिकवून धरले. राष्ट्रीय समाज पक्षानेही पालम नगरपंचायतीमध्ये पाच जागा मिळविल्या.

औरंगाबाद जिल्ह्यात सोयगाव मतदारसंघात शिवसेनेला सत्ता राखता आली. त्याचे श्रेय अब्दुल सत्तार यांना दिले जाते. ऋजालना जिल्ह्यातील धनसावंगी, तीर्थपुरी, बदनापूर, मंठा, जाफराबाद या पट्टयात राष्ट्रवादीचा पगडा दिसून आला. या नगरपंचयातीमध्ये सर्वाधिक जागा राष्ट्रवादीला तर त्या खालोखाल शिवसेनेला यश मिळाले. बीड जिल्ह्यात भाजपने जागा राखल्या पण लातूरमध्ये भाजपला यश मिळाले नाही. या जिल्ह्यातील चार नगरपंचायती भाजपच्या ताब्यात होत्या. त्यापैकी आता केवळ शिरुरअनंतपाळ ही एकमेव नगरपंचायत आता भाजपच्या ताब्यात आहे. शिवसेनेला मात्र औरंगाबाद व जालना वगळता अन्य जिल्ह्यात प्रभाव निर्माण करता आला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात राष्ट्रवादी कॉग्रेसबरोबर आघाडी करून सत्ता टिकवण्यात शिवसेनेला यश आले. वाशी नगरपंचायतीमध्ये भाजपने यश मिळविले. दहा जागांवर मिळालेले यश सेनेतील अंतर्गत दुफळीमुळे असल्याचे सांगण्यात येते. हा भाग आमदार तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनाही वाशी तालुक्यात प्रभाव निर्माण करता आला नसल्याचे चित्र निवडणूक निकालानंतर स्पष्ट झाले आहे.

असे आहे नगरपंचायतीमधील सत्तेचे गणित

  • भाजप – ०६
  • शिवसेना – ०४
  • काँग्रेस – ०५
  • राष्ट्रवादी काँग्रेस- ०५
  • प्रहार शक्ती संटना – १
  • स्थानिक आघाडी- १
  • महाविकास आघाडी-१

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election bjp ncp dominates nagar panchayats marathwada ysh

ताज्या बातम्या