scorecardresearch

आदित्य ठाकरे यांचे ‘मिशन औरंगाबाद’

अलीकडेच राज्यात महाराष्ट्र हवामान बदल परिषद गठित करण्यात आली असून दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शिवसेनेने शहरातील विविध प्रश्नांकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यांच्या कामांची पाहणी केली, तसेच प्रकल्पांचे लोकार्पण केले. मुंबईप्रमाणेच औरंगाबादमध्ये दुमजली बसेस खरेदी करण्याचेही त्यांनी जाहीर केले.

शहरातील खाम नदीच्या पुनर्जीवनाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. राज्यात ५१ टक्के नागरीकरण झालेले आहे. ४३ स्मार्ट शहरे आहेत. पायाभूत सुविधांचा विकास करताना जैवविविधता आणि पर्यावरणही जपावे लागेल, असे सांगत आदित्य ठाकरे यांनी पुनर्जीवनाचे औरंगाबाद महापालिकेने केलेले काम राज्यातील इतर शहरांनाही मार्गदर्शक ठरू शकते, असे सांगितले. महापालिकेच्या करावर नागरिकांची सुविधा व्हावी यासाठी जन्म-मृत्यू प्रमाणपत्रासह विविध ८० प्रकारच्या सुविधा व्हॉट्सअ‍ॅपवर उपलब्ध करून देता येतात का, याचाही अभ्यास केला जात आहे. हे काम लवकरच मार्गी लावू, असे ते म्हणाले.

प्रत्येक जिल्ह्यासाठी हवामान बदलाचे आराखडे

अलीकडेच राज्यात महाराष्ट्र हवामान बदल परिषद गठित करण्यात आली असून दुष्काळ आणि अतिवृष्टी यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. काही ठिकाणी गारपीट होते, तर कधी ढगफुटी होते. अशा स्थितीत प्रत्येक जिल्ह्याने हवामान बदलाचे आराखडे तयार करावेत, अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. मुंबईत असा आराखडा तयार केला जात असून औरंगाबादमध्ये हा आराखडा तयार करण्यासाठी लागणारी सांख्यिकीय माहिती आणि त्याचा कालबद्ध कार्यक्रम यावर चर्चा करण्यात आली.

सौरऊर्जेचेही प्रकल्प हाती घेणार

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गालगत २५० मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असून त्यातील ८० टक्के सौरपटल स्थिर, तर २० टक्के सौरपटल हलते राहतील, अशी त्याची रचना करण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच सौरऊर्जेतही प्रगती करायची असून २०२५ पर्यंत २५ टक्के वीज अपारंपरिक ऊर्जास्रोतातून निर्माण करावयाचे आहे.

सायकलवारी वाढावी

शहरांमधील रस्त्यांची बांधणी करताना त्यात रस्ते दुभाजक आणि सायकलसाठीच्या मार्गिकांचाही समावेश नियोजनात केला जावा. औरंगाबादमधील नव्या रस्त्यांच्या प्रस्तावात ही बाब आवर्जून लक्षात घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी बैठकीत दिल्या. सायकल मार्गिकांचा फारसा उपयोग होत नाही, तिथे वाहने लावली जातात, अशी टीका सर्वत्र होत असते. पण जेव्हा सायकल हे सुरक्षित माध्यम आहे हे कळू लागेल तेव्हा लोक त्याचा वापर वाढवतील. तशी वातावरण निर्मिती करावी लागणार आहे.

वेरुळ-र्अंजठा अभ्यागत केंद्रासाठी सामाजिक दायित्व निधी

गेल्या काही वर्षांपासून वेरुळ आणि र्अंजठा अभ्यागत केंद्रे बंद आहेत. तिथे वाहनतळांची सुविधा करण्यात आली आहे. वीज-पाणी तोडल्यानेही अडचणी आहेत. ते केंद्र पाहून तेथे नव्या सुविधा देण्यासाठी सामाजिक दायित्व निधीतून काही करता येईल का, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

शहरातील विकासकामांची रात्री पाहणी

औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये देण्यात आले होते. त्यातील काही रक्कम अद्याप महापालिकेला मिळालेली नाही. त्यानंतर मंजूर केलेल्या १५० कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे पूर्ण झाली आहेत, असे सांगण्यात आले होते. औरंगाबाद शहराच्या रस्त्यांविषयी झालेली टीका आणि त्यानंतरची कार्यवाही याचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी उशिरा रात्री शहरातील रस्त्यांचीही पाहणी केली.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Election of aurangabad municipal corporation shiv sena city aurangabad aaditya thackeray mission akp

ताज्या बातम्या