ध्वज विजयाचा उंच धरा रे..

ध्वज उभारल्यानंतर वाऱ्यापासून त्याचे संरक्षण ही समस्या असू शकेल.

ध्वजसंहितेमध्ये तिरंगा झेंडा कसा असावा, याचे वर्णन करण्यात आले आहे. एवढय़ा उंचीवर ध्वज फडकविण्यासाठी तो आकाराने मोठा ठेवावा लागेल. त्याचा आकार मोठा केला तर त्याला हवेचा दाब सहन होईल काय, अशी शंका असल्याने ध्वजसंहितेमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पाठवावा, अशी विनंती केली जाणार आहे. 

२१० फूट उंचीवर तिरंगा फडविण्याचा संकल्प या वर्षी हैदराबादमुक्ती दिनी पूर्ण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, असा ध्वज उभारल्यानंतर वाऱ्यापासून त्याचे संरक्षण ही समस्या असू शकेल. त्यामुळे हाताने तयार केलेला फायबरच्या धाग्याने तिरंगा तयार करण्यास मान्यता मिळावी तसेच त्यासाठी ध्वजसंहितेमध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. औरंगाबाद शहरातील काळा चबुतरा परिसरात सध्या सर्वात उंचीवर ध्वज फडकविण्याच्या प्रकल्पाला नव्याने गतीने दिली जात आहे. ध्वज फडकविण्यासाठी आवश्यक ती इलेक्ट्रिकल यंत्रसामग्री लावणे व उर्वरित बांधकाम सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असल्याची माहिती राम भोगले यांनी दिली. आतापर्यंत या प्रकल्पावर सव्वा कोटी रुपये खर्च झाले असून आणखी ७० लाख रुपये लोकवर्गणीतून एकत्रित केले जाणार आहेत.

सर्वात उंचीवर तिरंगा असावा, अशी संकल्पना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी मांडल्यानंतर मराठवाडय़ात त्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. उद्योजक राम भोगले यांनी विविध व्यक्तींकडून निधी एकत्रित केला. मात्र, हे काम काही दिवस रेंगाळले होते. आता पुन्हा त्याला वेग देण्यात आला आहे. हैदराबादमुक्ती दिनी ते सार्वजनिक ध्वजारोहण व्हावे, अशा पद्धतीने कामाला वेग देण्यात आला आहे. मात्र, एवढय़ा उंचीवर ध्वज गेल्यानंतर तो हवेच्या वेगामुळे फाटू शकतो. अटारीमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात. सीमेवर ध्वज बदलण्यासाठी लागणारा पैसा विचारात घेता उंचीवरील ध्वजांसाठी फायबरचा धागा वापरावा, अशा सूचना केल्या जात आहेत. भारतीय तिरंगा फक्त खादीच्या सुतापासून केला जातो. ध्वजसंहितेमध्ये तिरंगा झेंडा कसा असावा, याचे वर्णन करण्यात आले आहे. एवढय़ा उंचीवर ध्वज फडकविण्यासाठी तो आकाराने मोठा ठेवावा लागेल. त्याचा आकार मोठा केला तर त्याला हवेचा दाब सहन होईल काय, अशी शंका असल्याने ध्वजसंहितेमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव पाठवावा, अशी विनंती केली जाणार आहे.   काळा चबुतरा भागात झाशींच्या राणीचा एक पुतळा आहे. तो हलविला जाऊ नये, अशी मागणी सुरू आहे. तसेच या पुतळ्याबरोबरच स्वामी रामानंदतीर्थ यांचा पुतळाही बसवायचा आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न व्हायला हवेत. याबाबतचे निर्णय घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठकही लवकरच होणार आहे.

यंत्रणांसमोर नवा पेच..

उंचीवर तिरंगा खादीचा असावा की नाही, असा नवा पेच यंत्रणांसमोर निर्माण झाला आहे. खुलताबाद किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनी व प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण होते तेव्हा डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे लागते. दिवसभरात ध्वजाला काही होऊ नये याची काळजी घेतली जाते. तशी काळजी दोनशेहून अधिक फूट उंचीवरील ध्वजाबाबतीत घेणे जिकिरीचे असल्याने फायबर धाग्यापासून ध्वज तयार करण्यास परवानगी मिळू शकते काय, याची चाचपणी सुरू झाली आहे. उद्योजक राम भोगले म्हणाले की, कोल्हापूरमध्ये हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. तेथेही या प्रकारची अडचण जाणवत आहे. सीमाभागातही ही समस्या जाणवते. त्यामुळे ध्वजसंहितेमध्ये नवे बदल करता येतील का, हे पाहावे लागेल. मुंबईमध्ये या अनुषंगाने वरिष्ठांशी चर्चा करणार आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Electrical machinery flag of india marathi articles