Buddha Idol Sun Rays Festival : छत्रपती संभाजीनगर : भारतीय स्थापत्य कलेचा अभूतपूर्व आविष्कार म्हणून अजिंठा-वेरूळची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झालेली आहे. अलिकडच्या काळात याच स्थापत्य शास्त्राचे कुतुहल जागवणाऱ्या जागेचा अभ्यासक, पर्यटकांना परिचय होत असून, मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या कालावधीतील सूर्यकिरणोत्सव सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरल्याचे चित्र ९ मार्च रोजी हजारो पर्यटकांनी अनुभवले.
वेरूळ येथील लेणी क्रमांक ९ मधील तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीवर १ मार्चपासून सूर्यकिरणे पडण्यास सुरुवात होते. या सूर्यकिरणांमुळे बुद्धमूर्ती तेजाळून निघते. एक प्रकारे दोन तेज एकमेकांवर पडल्याचा आणि दोन तेज एका प्रकाशात न्हाऊन निघाल्याचा हा किरणोत्सवाचा क्षण अभ्यासक मानतात, असे मूर्ती व शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉ. संजय पाईकराव यांनी सांगितले.
उत्तरायणात किरणोत्सव
दरवर्षी मकर संक्रांतीनंतर सूर्याचे उत्तरायण सुरू होते. सूर्य तापण्यास सुरुवात होते. तत्कालीन स्थापत्यकारांनी तथागत गौतम बुद्धांना एक तर दुसरे तेज सूर्याला मानून या दोन्ही तेजांचे मीलन घडेल अशा रचनेत लेणीचे निर्माण केले. १ मार्चला सूर्यकिरणे लेणीतील बुद्ध मूर्तींच्या चरणांवर विसावतात. तेथून दररोज बुद्धांचे एक-एक अंग व्यापत १० मार्चला पूर्ण मुखावर स्थिरावतात. ११ मार्चला मुखापासून बाजूला कलतात आणि १२ ला मूर्तीचा पूर्णभाग सोडतात.
यंदा १० मार्चला नेमकी सुटी
वेरूळ लेणीला दर मंगळवारी साप्ताहिक सुट्टी असते. आणि नेमका सूर्यकिरण बुद्धांच्या मुखावर येण्याचा यंदाचा दिवस १० मार्च हा सुटीच्या दिवशीच आल्याने हा अनुपम्य सोहळा पाहण्याच्या क्षणाला पर्यटकांना मुकावे लागले.
सुटी रद्द करण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना निवेदन
मूर्ती व शिल्प संशोधन संस्थेचे सचिव डॉ. संजय पाईकराव यांनी सांगितले की, यंदा लेणीतील तथागत गौतम बुद्ध यांच्या मुखावर सूर्यकिरणे पडण्याच्या १० मार्चच्या दिवशीच साप्ताहिक सुटी आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. ही सुट्टी रद्द करण्यासाठी आम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह सर्व संबंधित विभागांना अनेकवेळा ई मेल केले. परंतु सरकारी व्यवस्थेनुसार साप्ताहिक ही ठरवून दिलेली सुट्टी रद्द झाली नाही. अनेकांनी ९ मार्च रोजी किरणोत्सव पाहण्याचा आनंद घेतला.
