वीज कनेकशनचे कोटेशन देण्यासाठी ७०० रुपयांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ उपअभियंत्यास येथील विशेष न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लाचेचा प्रकार आठ वर्षांपूर्वी (२००७) घडला होता.
रमेश जनार्दन देशपांडे असे शिक्षा झालेल्या अभियंत्याचे नाव आहे. महावितरणच्या बायजीपुरा उपकेंद्रात कार्यरत असताना देशपांडे याने ५ ऑक्टोबर २००७ रोजी वीज कनेकशनचे कोटेशन देण्यासाठी तक्रारदाराकडे ७०० रुपये लाचेची मागणी केली होती. या प्रकरणी केलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधीक्षक संग्राम सांगळे यांच्या पथकाने देशपांडे याला पंचासमक्ष लाच घेत असताना पकडले होते. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. तपासी अंमलदार लाचलुचपतचे पोलीस उपअधीक्षक सांगळे यांनी देशपांडे याच्याविरोधात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. विशेष न्यायालयाचे ( पाचवे कोर्ट) विशेष न्यायाधीश पी. एस. शिंदे यांच्यासमोर या बाबत सुनावणी झाली. सोमवारी त्यांनी या बाबत निकाल दिला. एका कलमान्वये देशपांडे याला १ वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद, तसेच अन्य कलमांन्वये एक वर्ष सक्तमजुरी, ५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे एस. एम. रजवी व भीमराव पवार यांनी काम पाहिले.