२५० मोटारींसह ५० बसचीही खरेदी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील उद्यमशीलतेची आश्वासकता दर्शवण्याचा एक वेगळा प्रयत्न म्हणून  मार्चपर्यंत २५० इलेक्ट्रिक चार चाकी वाहने, त्यापुढील कालावधीत ५० बस, ५०० तीनचाकी गाड्या आणि एक हजार दुचाकी खरेदी करण्याचा संकल्प करत पर्यावरण स्नेह वाढविण्याचा उपक्रम औरंगाबादमधील उद्योग व व्यापाऱ्यांनी हाती घेतला आहे.

१५० मर्सिडिज खरेदी केल्यानंतर औरंगाबाद शहराच्या उद्यमशीलता आणि उलाढालीची  राज्यभर चर्चा झाली होती. अशाच प्रकारची कार्यपद्धती वापरत औरंगाबादमध्ये ‘हरितस्नेही’ मोहिमेस सुरुवात करण्यात आल्याची घोषणा ‘मराठवाडा ऑटो क्लस्टर’चे अध्यक्ष मुनिष शर्मा, आशिष गर्दे, प्रसाद कोकीळ यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत केली. इलेक्ट्रिक वाहने खरेदी केल्यास मिळणारी सवलत ३१ मार्च असल्याने एकत्रित वाहन खरेदी झाल्यास पुरवठादार कंपन्यांसह, डिलर तसेच विमा कंपन्यांकडून मिळणारा लाभ प्रत्येक खरेदीदारास मिळणार आहे. याशिवाय ई-वाहन खरेदीसाठी दिलेल्या सवलतीचाही लाभ होऊ शकेल. ही सवलत वैयक्तिक नावाने मिळणार असल्याने त्याची खरेदी स्वतंत्रपणे केली जात आहे. पण त्यात सुसूत्रता असेल असे उद्योजक प्रसाद कोकीळ म्हणाले. औरंगाबाद शहर स्मार्ट बनविण्याची प्रक्रिया हाती घेतली जात असतानाच पुढील पिढ्यांना स्वच्छ आणि शुद्ध हवापाणी देण्याचा मार्ग म्हणून या उपक्रमाकडे पाहावे असे मुनिष शर्मा म्हणाले.  मार्चपर्यंत चार चाकी कार खरेदी केल्या जातील. त्यानंतर उद्योगांमध्ये बस व दुचाकी खरेदीचे नियोजन हाती घेण्यात आले आहे. मराठवाडा ऑटो क्लस्टर, क्रीम अ‍ॅन्ड क्रंच, इंडियन मेडिकल असोशिएशन, एमआयटी महाविद्यालय, मासिआ ही लघू व मध्यम उद्योजकांची संघटना, मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड असोशिएशनचे कार्यालय येथे मोटार चाचणीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. १५ लाख रुपयांच्या चारचाकीमध्ये तीन लाख रुपयांपर्यंतची सवलत मिळू शकते असा अंदाज असून एकत्रित गाड्या खरेदीमुळे शहराच्या उद्यमशीलतेतील आश्वासकता पुढे येणार आहे. देशभरात ई-वाहनांच्या खरेदी- विक्रीला प्रोत्साहन दिले जात आहे. अलीकडेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही औरंगाबाद शहर वाहतुकीमध्ये इलेक्ट्रीकल वाहनेच खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईमध्ये बसखरेदीसाठी आलेल्या निविदेनुसार प्रतिकिलोमीटर ७२ पैसे एवढाच दर येत असल्याचेही त्यांनी सांगितले होते. केंद्र सरकारच्या धोरणाला प्रतिसाद आणि कोविडकाळातील अर्थगतीला चालना देण्यासाठी औरंगाबाद शहरातील पर्यावरणस्नेही गाड्यांची खरेदी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. सध्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील चारचाकीमध्ये टाटाच्या गाड्यांचा बोलबाला आहे. या खरेदीमुळे चार्जिंग स्थानके व सुविधाही वाढतील असा दावा उद्योजकांनी पत्रकार बैठकीत केला.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Entrepreneurs in aurangabad want to buy one thousand electronic two wheelers with 250 cars akp
First published on: 28-01-2022 at 23:59 IST