४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ठराव

औरंगाबाद : महाराष्ट्राचा सर्व लोकव्यवहार हा सर्वदूर मराठीतूनच व्हावा, या मागणीसाठी मराठी विषयक काम करणाऱ्या विविध साहित्य व भाषा विषयक संस्थांनी कर्नाटक राज्याच्या धर्तीवर अर्धन्यायिक अधिकारात येणारे स्वायत्त स्वरूपाचे मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन होणे मराठीच्या विकासासाठी आवश्यक असल्यासह नऊ ठराव करून ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे रविवारी येथे सूप वाजले. प्राधिकरणाच्या ठरावाचे सूचक मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, तर त्याला डॉ. चेतना सोनकांबळे या अनुमोदक होत्या.

संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात या ठरावांचे वाचन करण्यात आले. पहिला ठराव हा मसापच्या दिवंगत पदाधिकाऱ्यांसह महाराष्ट्र आणि देशातील निधन पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करणारा होता. महाराष्ट्र शासनाने आगामी शैक्षणिक वर्षांपासून मराठी विद्यापीठ कार्यान्वित करावे. प्रत्येक जिल्ह्यच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय मराठी भाषा समिती निर्माण केल्याबद्दल हे संमेलन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि  मराठी भाषा मंत्री यांचे सहर्ष अभिनंदन करत आहे,असा ठरावही करण्यात आला.

समृद्धी महामार्गालगत असलेल्या बाजारपेठा, नवे उद्योग, प्रक्रिया उद्योग यासाठी दळणवळणाच्या इतर व्यवस्थांची उभारणी करावी. हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास मराठवाडय़ातील या लगतच्या पट्टय़ातील शेकडो गावांना आणि स्थानिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनाही या कामात सहभागी करून घेत, त्यांचाही वाटा ठरवून दिला पाहिजे. या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावेत, अशी आग्रहाची मागणी हे साहित्य संमेलन महाराष्ट्र शासनाकडे करीत आहे. इंग्रजी शाळांमधूनही मराठीला प्रथम भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी करणाराही ठराव करण्यात आला. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या येत्या वर्षी सुरू होणाऱ्या अमृतमहोत्सवी वर्षांत शासकीय आणि अशासकीय स्तरावर वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले जावे. मराठवाडा साहित्य परिषदेला महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने वर्षांरंभीच विशेष अनुदान देण्यासह शेतकरी, रेल्वेशी जोडण्याच्या मार्गाबाबतचेही ठराव करण्यात आले. शेतक ऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारी भूमिकाही ठरावातून मांडण्यात आली आहे.

वाचन संस्कृतीचा ऱ्हास रोखण्याचे आव्हान – आव्हाड

उर्दू ही मूळ भारतीय भाषा असून मराठी ही मराठवाडय़ातून जन्माला आलेली भाषा असल्याचे सांगत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ऱ्हास होत असलेली वाचन संस्कृती पुन्हा एकदा समाजमाध्यमांवरील अग्रेषित करणाऱ्या विचित्र विचार, संदेशांमध्ये अडकलेल्या आजच्या पिढीमध्ये रुजवण्याची अपेक्षा साहित्यिकांकडून व्यक्त केली. गोदावरीच्या पाण्याची चव गंगेपेक्षाही जशी गोड आहे, तसे येथील साहित्यही आहे. समाजाला कुठल्या प्रागतिक विचारांची गरज आहे, हे ओळखून साहित्यिकांनी त्यासाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ठरावातील औरंगाबाद ते अजिंठा रेल्वेच्या मागणीच्या ठरावाला पाठिंबा असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. साहित्यातून क्रांती घडवण्याची ताकद राज्यकर्त्यांमुळे कमी झाली आहे, असेही ते म्हणाले. मलिक अंबरने येथील पाण्याचा प्रश्न ज्या पद्धतीने सोडवला तो आजपर्यंतच्या कोणत्याही जलसंपदा मंत्र्याला सोडवता आला नाही, असेही आव्हाड म्हणाले. आव्हाड संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार, स्वागताध्यक्ष प्रा. डॉ. राजेश करपे, कौतिकराव ठाले पाटील, ‘पाचोळा’कार रा. रं. बोराडे, दादा गोरे आदींची उपस्थिती होती.

आम्हाला पैसे द्या – ठाले पाटील

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या येत्या वर्षी सुरू होणाऱ्या अमृतमहोत्सवी वर्षांस सुरुवात होत असून त्यासाठी शासकीय आणि अशासकीय स्तरावर वर्षभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी आम्हाला पैसे द्यावेत, अशी मागणी मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली. मसाप ही क्रांतीसाठी जन्माला आलेली संस्था असल्याचेही सांगितले.

औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपाचा कार्यR म उत्साहात पार पडला. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार, प्रमुख पाहुणे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आदी उपस्थित होते.