नांदेड: विदर्भ आणि मराठवाड्याच्या लाभासाठी होत असलेल्या निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या (चिमटा धरण) कामासाठी १५ वर्षांपूर्वी भूसंपादन करण्यात आले; पण प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि इतर अनेक प्रश्न अद्यापही सुटले नसल्यामुळे किनवट तालुक्यातील खंबाळा गावच्या धरणग्रस्तांनी मागील चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले असून ‘आधी पुनर्वसन, मगच काम’ अशी भूमिका जाहीर केली आहे.
धरणग्रस्तांच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या बाबतीत शासन आणि प्रशासनाने आतापर्यंत चालढकल चालवली आहे. २००७ ते २०१३ या दरम्यान खंबाळा गावातील शेतजमिनी वरील प्रकल्पासाठी संपादित करण्यात आल्या, तरी बाधीत शेतकर्यांना संपूर्ण मोबदला मिळालेला नाही. तसेच पुनर्वसनाचे काम रखडले आहे; पण दुसर्या बाजूला प्रकल्पावरील कामे रेटण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे विदर्भ बळीराजा प्रकल्प प्रगती संघर्ष समितीच्या वतीने १७ फेब्रुवारीपासून बाधीत शेतकर्यांनी उपोषण सुरू केले. ते पाचव्या दिवशीही सुरू होते.
खंबाळा येथील ग्रामस्थांनी उपोषण सुरू करण्यापूर्वी नांदेड जिल्हाधिकार्यांसह सर्व संबंधितांना पूर्वसूचना दिली होती; पण त्यात कोणीही गंभीरपणे लक्ष घातले नसल्यामुळे हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल यादव नाईक, माजी जि.प. सदस्य बंडू नाईक व राहुल नाईक यांनी उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची भेट घेऊन त्यांची तीव्र भावना प्रशासनाला कळविण्याचे आश्वासन दिले.
धरणग्रस्तांच्या मागण्या वेळोवेळी संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या; पण आजपर्यंत समाधानकारक तोडगा काढण्यात आला नाही, असे सांगण्यात आले. प्रशासनाची मनमानी सहन केली जाणार नाही, असे उपोषणार्थींपैकी चंपत नाईक चव्हाण, जीवन चव्हाण, विठ्ठल राठोड यांनी स्पष्ट केले.
