जिल्ह्यत शेतकऱ्यांना पेरणीसाठी खत, बियाणे आवश्यक आहे, मात्र पसा नसल्याने तो बँकेच्या दारात पीककर्जासाठी उभा आहे. बँकेकडून अडवणूक होत असल्याने तो चांगलाच त्रस्त झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देषावरून उशिरा का होईना पालकमंत्री दिलीप कांबळे उद्या (शुक्रवारी) खरीप हंगामानिमित्ताने पीककर्ज आढावा बठक घेणार आहेत. बँकांनी आतापर्यंत केवळ १५ टक्के पीककर्जाचे वाटप केले. बठकीनंतर बँकांची भूमिका काय? यावर शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
मृग नक्षत्र सुरू होऊन दोन दिवस उलटले. पाऊस तोंडावर आला असताना शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला लागला आहे. गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांकडे बियाण्यांसाठी पसा नसल्याने तो बँकेच्या दारात उभा आहे. मात्र, बँकेकडून अडवणूक होत असल्याने शेतकरी आज तरी हवालदिल झाल्याचे चित्र जिल्हाभर पाहावयास मिळते. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप पिकांसाठी कर्जवाटपाचे उद्दिष्ट ९६८ कोटी ५० लाखांचे दिले आहे.
मात्र, बँकांकडून पीककर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. सरकारने ३१ मेअखेर पीककर्ज वाटपाची अंतिम मुदत दिली असताना जूनच्या पहिल्या आठवडय़ात जिल्ह्यतील विविध बँकांकडून ३७ हजार ६४७ शेतकऱ्यांना १४५ कोटी ४८.०९ लाख कर्जवाटप केले. वाटपाची टक्केवारी केवळ १५ टक्के आहे. १२ हजार १२६ शेतकऱ्यांच्या पीककर्जाचे पुनर्गठण झाले असून ६६ कोटी ८९ लाखांचे पीककर्ज शेतकऱ्यांना मिळाले आहे.