नाटय़शास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या हाती गणपती विक्रीसह शेतीचे काम

राहुलने नाटय़ शास्त्राचे पदव्युत्तर (एमपीए- मास्टर ऑफ परफॉर्मन्स आर्ट) शिक्षण पूर्ण केलेले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

बिपिन देशपांडे लोकसत्ता
औरंगाबाद
: ‘रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून..’ या विंगेतून येणाऱ्या भारदस्त आवाजानंतर रंगभूमीवरून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडण्याचे स्वप्न बाळगून नाटय़ शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांवर सध्या चरितार्थासाठी घरोघर जाऊन गणपती विक्री करण्याची वेळ आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाटय़ विभागातून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या अनेक विद्यार्थ्यांना मिळेल त्या कामासह शेतीतही जाऊन राबण्यासारखा जीवन संघर्ष करावा लागत आहे.

राहुल, आशीष आणि मनोज ही तिकडी औरंगाबादेत त्यांच्याच एका मित्राकडून तयार करण्यात आलेल्या गणपतीचे विपणन करण्याच्या कामात गुंतले आहेत. समाजमाध्यमावरून गणपती मूर्तीचे विविध प्रकार पाठवणे. त्याखाली मूर्तीचे दर व घरपोच सेवा देण्यात येईल, अशी एक ओळ लिहून गणपती खरेदीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन करत आहेत. नाटय़क्षेत्र बंद असल्यामुळे गतवर्षांपासून आमचे हाल सुरू असल्याचे राहुल सांगतो. राहुलने नाटय़ शास्त्राचे पदव्युत्तर (एमपीए- मास्टर ऑफ परफॉर्मन्स आर्ट) शिक्षण पूर्ण केलेले आहे. काही महिन्यांपूर्वी इच्छा नसतानाही कुटुंबीयांच्या आग्रहाखातर लग्न करावे लागले. आपल्यासारखे असे अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आहेत. आता अनेकांचे दोनाचे चार हात झाले आहेत. तेव्हा कुटुंबाकडून चरितार्थासाठी चार पैसे कमावून आणण्याचा तगादा लावला जातो. घरातील माझ्यासारख्या कमावत्याला काहीतरी काम-धंदा करण्याशिवाय पर्याय नाही. हौशी, प्रायोगिक, व्यावसायिक असे सर्वच प्रकारचे नाटय़प्रयोग सध्या बंद आहेत. नाटय़प्रयोगांना परवानगी मिळण्यााठी आंदोलने सुरू आहेत. करोना परिस्थितीचा पडदा अद्याप नीटसा बाजूला सरला नसल्याने संघर्षांसाठी मुंबईतही जाऊन पाऊल ठेवता येत नाही. परिणामी नाटय़ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या तरुणाईपुढे चरितार्थ चालवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्यातील काही जण गावी परतले आहेत आणि ते तिथे आज शेती करणे, घरची गुरं-ढोरं सांभाळण्यासारखी कामे करत आहेत. नाटय़ क्षेत्रातील शिक्षण हे ऑनलाइन घेता येण्याचा विषय नाही. त्यामुळे इतरांचेही एका अर्थाने शिक्षण थांबले आहे, असे राहुल सांगतो.

करोना काळात वेगवेगळे लावण्यात आलेले नियम कलेच्या क्षेत्रालाही लागू आहेत. अभिनय, नेपथ्य, संगीत, रंग-वेषभूषा, दिग्दर्शनाचा अभ्यास करून विद्यार्थी संघर्षांसाठी मुंबईला जातात. मात्र, तेथे अजूनही म्हणावे तसे कलावंतांसाठी संधी उपलब्ध होत नाहीत. रंगभूमी सुरू नाही. त्यामुळे ज्या क्षेत्रात आपण ज्ञान मिळवलेले आहे त्याचा उपयोग सध्या होत नसल्याने विद्यार्थी गावी परतले आहेत. शेतीत आई-वडिलांना हातभार लावत आहेत. इतरही मिळेल ती कामे करत आहेत. नाटय़ शास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. रंगभूमीचे क्षेत्र खुले होण्यासाठी अनेकांनी सरकारदरबारी कलावंतांची व्यथा मांडली आहे. नवोदित कलावंतांचे हाल होत आहेत.

– प्रा. डॉ. जयंत शेवतेकर, नाटय़ शास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Farming work including sale of ganpati in the hands of drama students zws

ताज्या बातम्या