छत्रपती संभाजीनगर, जालना – छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या वेगवेगळ्या दोन कारवायांमध्ये मोठा माल जप्त केला आहे. दिवाळीच्या तोंडावरच ही कारवाई करण्यात आली असून, खाद्यपदार्थ निर्मितीमधील वस्तुंचा पुरवठा करणारे आणि नागरिकांचे आरोग्य टांगणीला टांगून केवळ नफाखोरीचा विचार बाळगणाऱ्या विक्रेत्यांना चांगला चाप बसल्याने बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे.

सुरक्षित महाराष्ट्रअंतर्गत जालना जिल्ह्यात मुंबई दक्षता विभागाच्या गोपनीय माहितीनुसार जालना अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत प्रचलित ब्रॅण्डचे तब्बल ११ हजार ३९४ किलोग्रॅम तूप जप्त केले आहे. या तुपाची किंमत १६ लाख ६८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

जालना येथील नवीन मार्केट यार्ड परिसरातील एका मोठ्या व्यापाऱ्यावर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि निकृष्ट दर्जाचे असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेले तूप हे अपमिश्रित किंवा निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय असून, तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले.

अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती ए. ई. तांबे यांच्यासह व्ही. के. ओसवार, एस. ए. केदार आणि वाय. डी. चिबडे यांच्या पथकाने जालना विभागाचे सहाय्यक आयुक्त एन. एस. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि छत्रपती संभाजीनगर विभागाचे सह आयुक्त मा. श्री. एस. आर. करकळे आणी सह आयुक्त दक्षता प्रीती टिपरे निर्देशानुसार करण्यात आली पडली.

छत्रपती संभाजीनगर शहरातील मसाले कंपनीवर छापा

शहरातील मसाले कंपनीवर टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये २ हजार ८०२ किलोग्रॅम हळद पावडर, मिरची पावडर, धणे पावडर, मटण मसाला साठा जप्त आला आहे. या जप्त मालाची किंमत १६ लाख ४० हजार ९०० रुपये असून उत्पादन युनिटचा अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने (एफडीए) देण्यात आली आहे. अन्न सुरक्षा अधिकारी पी. एस. कुचेकर यांच्या पथकाने ही कारवाई गाढे जळगाव येथील गट क्र. २९९/पी येथील जागेवरील कारखान्यात केली आहे.

कारवाईच्या वेळी पंच म्हणून संतोष मारुती भुते (रा. हर्सूल) उपस्थित होते. जप्त करण्यात आलेला सर्व साठा रीतसर सील करण्यात आला असून तो पुढील आदेशापर्यंत कारखान्याचे एफबीओ (फूड बिजनेस ऑपरेटर) शेख रेहमत शेख फसाद पटेल यांच्या ताब्यात सुरक्षेसाठी देण्यात आला आहे. या साठ्याशी कोणत्याही प्रकारची छेडछाड न करण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या अशा अन्नपदार्थ उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून भविष्यातही कडक कारवाई सुरू राहील, असा इशारा श्रीकांत करकळे सह आयुक्त यानी दिला आहे..