मुंबई : अन्न व औषधी प्रशासनाकडून होणाऱ्या धडाकेबाज कारवायांचे आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांचे सर्वत्र कौतुक होत असताना भेसळीचे नमुने तपासणीसाठी मनुष्यबळच नसल्याची बाब कर्मचाऱ्यांनी निवेदन देऊन मंत्र्यापर्यंत पोहोचवली आहे. राज्यातील तीन प्रयोगशाळांमध्ये केवळ १२० मनुष्यबळ उपलब्ध आहे. यामुळे सध्या विश्लेषणाचे काम करण्यासाठी दोन सत्रांमध्ये काम करण्याच्या सूचना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्या. या विरोधात आता कर्मचाऱ्यांनी मंत्री नरहरी झिरवळ यांना निवेदन दिले आहे.

कितीही काम केले तरी एका विश्लेषकाकडून १२ ते १४ नमुन्यांचेच गुणवत्ता पूर्ण विश्लेषण होऊ शकते, अशी वस्तुस्थिती कर्मचाऱ्यांनी मंत्र्यासमोर मांडली आहे. दोन सत्रात काम करवून घेण्याचा आयुक्तांचा निर्णयही शासनाच्या पूर्वीच्या निर्णयाशी विसंगत असल्याचा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा आक्षेप आहे.अन्न व औषधी विभागात मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे प्रत्येकी एक प्रयोगशाळा आहे. होणाऱ्या कारवाया आणि नमुने विश्लेषणाचा वेग लक्षात घ्यावा यासाठी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या अडचणी मंत्र्यांना पत्र लिहून मांडल्या आहेत.

औषधांच्या नमुन्याचे विश्लेषण तीन प्रकारे केले जाते. भारतीय औषधी संहिता, ब्रिटिश औषध संहिता आणि युनायटेड स्टेट्स औषधी संहितेनुसार केले जाते. गेल्या २० वर्षांत या संहितेच्या मानांकनामध्ये वारंवार सुधारणा झाल्या आहेत. परिणामी प्रत्येक नमुन्याच्या विश्लेषणासाठी अधिक वेळ लागतो. त्यामुळे एका विश्लेषकाकडून १२ ते १४ नमुन्यांचे गुणवत्तापूर्ण विश्लेषण होऊ शकते.

गेल्या महिनाभरात शासकीय सुट्या, सार्वजनिक सुट्या याचा विचार न करता जुलै महिन्यात दोन सत्रात विश्लेषण करून देण्यात आले. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून सहकार्याचा अभाव आहे, असे नाही, असेही कर्मचाऱ्यांनी पत्रात नमूद केले आहे. अन्न व औषधी प्रयोगशाळांच्या यंत्रसामग्रीच्या आधारे ४० ते ५० नमुने तपासले जाऊ शकतील. मात्र, असे करण्यासाठी विश्लेषकांची संख्या वाढविणे गरजेचे आहे.

तसे न झाल्याने ताण वाढत आहे. त्यामुळे सध्या सुरू असणारी दोन सत्राची वेळ बदलावी, अशी मागणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे. सध्या सकाळी ७ ते दुपारी तीन आणि दुपारी १२ ते रात्री ८ वाजेपर्यंत अशा दोन सत्रात प्रयोगशाळेतील कर्मचारी काम करतात. ही बाब शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेशी जुळणारी नाही. त्यामुळे सकाळी ९.४५ ते ६.१५ अशी कार्यालयाची वेळ करावी, अशी विनंती कर्मचाऱ्यांनी केली आहे.