महाराष्ट्रातील धरणांवर परदेशी माशांचा ताबा

प्रमुख धरणांमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक परदेशी माशांचा शिरकाव झालेला आहे.

महाराष्ट्रातील धरणांवर परदेशी माशांचा ताबा

बिपीन देशपांडे, लोकसत्ता

औरंगाबाद : भारतात नील क्रांती (ब्ल्यू रिव्होल्यूशन) घडवण्याच्या उद्देशाने आणलेल्या तिलापिया उर्फ चिलापीसारख्या आफ्रिकन व इतर नऊ प्रकारच्या परदेशी माशांनी महाराष्ट्रासह देशातीलही प्रमुख धरण व गंगा, गोदावरी, यमुनेसारख्या महत्त्वाच्या नद्यांवरही ताबा मिळवला असून कटला, रोहू, मरळ, वांबट या पारंपरिक देसी माशांचे अस्तित्व मात्र धोक्यात आले आहे.

प्रमुख धरणांमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक परदेशी माशांचा शिरकाव झालेला आहे. मराठवाडय़ातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातील भीमा नदीवरील उजनी धरणातही एकूण मत्स्योत्पादनाच्या ९० टक्क्यांपेक्षा अधिक जास्त प्रमाण एकटय़ा तिलापियाचे आढळून आहे. अमरावती धरणातही तेवढेच प्रमाण आहे. यासंदर्भाने १५ लाखांच्या प्रकल्पातून केलेल्या अभ्यासाअंती एक अहवाल विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सोपवण्यात आलेला आहे.  मराठवाडय़ातील माजलगाव, वाण (जि. बीड), हरणी-काटगाव (उस्मानाबाद), घरणी (लातूर), सिद्धेश्वर आणि भाटेगाव (हिंगोली) या सहा धरणांमध्येही तिलापिया, सायप्रिनस, गवत्या आणि चंदेरी या माशांचे वाढते अस्तित्व मस्त्यअभ्यासकांसाठी चिंता वाढवणारे ठरत आहे.

माजलगाव धरणात सायप्रिनस आणि तिलापिया तर लातूरमधील महत्त्वाच्या धरणांमध्ये गवत्या व सायप्रिनस या दोन मत्स्यजातींचे एकत्रित प्रमाण ३७ टक्क्यांवर तर कृष्णगिरी व मालपुझ्झा धरणात ७० टक्के प्रमाण तिलापियाचे आढळले आहे. त्यामुळे कटला या जातीची वाढ खुंटली जात असल्याचेही दिसून आले आहे. कटला या भारतीयांची पसंती असलेल्या देसी पारंपरिक प्रजातीचे अस्तित्व धोक्यात येण्यामागे तिलापियाचे कायम स्वरुपी सुरू असलेले प्रजनन आणि अन्न मिळवण्यासाठीची स्पर्धा, ही प्रमुख कारणे आहेत.  अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे सहयोगी डॉ. विश्वास साखरे यांनी ‘स्थानिक मत्स्यजातींवर परदेशी माशांचा झालेला परिणाम : कारणे व उपाय’ या विषयावर मांडलेल्या संशोधन प्रकल्पातून उपरोक्त माहितीचा अहवाल विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मांडला आहे. डॉ. साखरे यांनी सांगितले की, भारताच्या जैवविविधतेत स्थानिक १ हजार ८०० माशांच्या प्रजाती असून त्या गोडय़ा पाण्यामध्ये सापडतात. त्यातील मराठवाडय़ात २७ ते २८ स्थानिक मत्स्यजाती सापडतात. मराठवाडय़ात ३५ टक्क्यांपेक्षा जास्त परदेशी माशांचा शिरकाव आढळून आलेला आहे. तिलापियासह कॉमन कॉर्प अर्थात सिट्रिडस. चंदेरी (सिल्वर कार्प), गवत्या (ग्रास कार्प), सायप्रिनस किंवा सिप्रिनस, पंगॅसिससह नऊ प्रकारच्या परदेशी प्रजाती आहेत.

परदेशी माशांच्या शिरकाव्यामुळे आपल्या धरणांमध्ये उत्तम प्लवंगासारखे खाद्य असतानाही आणि पाण्याची गुणवत्ता असतानाही देशी प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तिलापिया हा मासा २०० ग्रॅमपेक्षा मोठाच होत नाही. त्याची फारशी विक्रीही होत नाही.  ग्लॅरिअस गॅरिपिल्लस हा आफ्रिकी मासा तीन दिवस अन्न मिळाले नाही तर पाणी दूषित करतो. यामुळे जैवविविधतेलाही धोका निर्माण झाला आहे. हिल्सा या कोलकाता, बांगलादेशच्या सीमेवर आढळणारा आणि त्यावरून मोठी आर्थिक उलाढाल करून होणाऱ्या या माशाचे अस्तित्वही धोक्यात आले आहे.

प्रा. डॉ. विश्वास साखरे

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Foreign fish in maharashtra dams threatened for indigenous fish zws

Next Story
देवेंद्र फडणवीस यांचे राज्यात कौतुक; मराठवाडय़ात रोष ; पंकजा मुंडे यांना उमेदवारी नाकारल्याने समर्थक आक्रमक
फोटो गॅलरी