मनात काम करण्याची इच्छाशक्ती असली की कामाला कशाचंच बंधन रहात नाही आणि सर्व बंधन गळून पडतात. साठी पार केलेल्या रेखा जैस्वाल यांनी हेच दाखवून दिलं आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आणि योग शिक्षिका असलेल्या रेखा जैस्वाल या त्यांचा ६१ वा जन्म दिवस आणि शिक्षकदिन या दुहेरी मुहूर्तावर विशेष पोलीस अधिकारी म्हणून कर्तव्य बजावणार आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान कर्तव्य बजावण्यासाठी त्यांनी सोमवारी जिल्हापरिषदेच्या मैदानावर हजेरी लावली होती.

औरंगाबादचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या संकल्पनेतुन शहरात विशेष पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली जात आहे. दहा हजार पोलीस अधिकाऱ्यांची शहरात नियुक्ती करणार असल्याचं यापूर्वी पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केल आहे. पहिल्या टप्प्यात गणेश विसर्जनासाठी एक हजार विशेष पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान पोलिसांच्या मदतीला त्यांना पाचारण करण्यात आलं आहे. आज त्यांच पथसंचलन घेण्यात आलं. आठवडाभरात अशा पोलीस अधिकाऱ्यांना बारा तास त्यांच्या सोईनुसार ड्युटी करावी लागणार आहे. त्याच मोहिमेत माजी नगरसेविका असलेल्या रेखा जैस्वाल यांनी सहभाग नोंदवला आहे.
योग शिक्षिका असलेल्या रेखा जैस्वाल यांचा उद्या ६१ वा जन्म दिवस आहे. योगायोगाने शिक्षक दिन आणि जन्म दिवशी त्या विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करतील. आपल्याला काम करण्याची मनात इच्छा होती. त्यामुळे या मोहिमेत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितलं.

आठवडाभरात बारा तास ड्युटी करायची असली तरी तीही सोयीनुसार त्यामुळं जास्त त्रास होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलीस देशासाठी अहोरात्र काम करतात. या मोहिमेमुळे आपल्याला काम करण्याची संधी मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. मानसशास्त्र विषयात पदवीधर असलेल्या रेखा जैस्वाल २००० साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.