scorecardresearch

माजी मंत्री प्रा. सुरेश नवले एकनाथ शिंदे गटात

आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवलेंनी मित्रमंडळाची स्थापना करून नव्याने राजकीय प्रवास सुरू केला.

suresh-navle
माजी मंत्री प्रा. सुरेश नवले

बीड-  शिवसेना सत्तेत नसतानाही शिवसैनिकांचा धाक होता. मात्र, पक्ष मूळ ध्येयापासून बाजूला गेल्याने सत्तेत असताना सामान्य शिवसैनिक हतबल झाल्याचे चित्र निर्माण झाले. मातोश्रीवर पक्षप्रमुखांना भेटायला मंत्री, आमदारांनाही वेळ मिळत नव्हता तेव्हा एकनाथराव शिंदे सामान्य सैनिकापासून आमदारांपर्यंत आशेचा किरण निर्माण झाले आणि त्यातून सर्वच आमदारांनी शिंदेच्या नेतृत्वाखाली वेगळी भूमिका घेतली. या भूमिकेचे प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाकडून जाहीर समर्थन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रा.सुरेश नवले हे शिंदे गटात सामील झाल्याचे मानले जात आहे.

बीड विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा शिवसेनेच्या उमेदवारीवर विजयी होऊन भाजप-सेना युतीच्या काळातील माजी ऊर्जा राज्यमंत्री प्रा. सुरेश नवले यांनी बीड मतदारसंघात मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक आजी-माजी आमदारांच्या उपस्थितीत मित्रमंडळाची स्थापना करून आपल्या नव्या राजकीय वाटचालीला सुरुवात केली आहे. युतीच्या काळात मंत्री असताना प्रा. सुरेश नवले यांनी तत्कालीन बंडखोर नेते गणेश नाईक, गुलाबराव गावंडे यांच्याबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याविरुद्ध बंड केले होते. त्यानंतर शिवसेनेने नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले. मात्र नंतरच्या निवडणुकीत नवले यांच्या जनशक्तीचा प्रयोग फसला आणि नारायण राणे यांच्या बंडात नवलेंनी साथ दिली.

परिणामी काँग्रेसकडून नवलेंचे विधान परिषदेवर पुनर्वसन झाले. नारायण राणे भाजपात गेल्यानंतर मात्र नवले राजकीय विजनवासात गेले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवलेंनी मित्रमंडळाची स्थापना करून नव्याने राजकीय प्रवास सुरू केला. त्यातच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बंड केल्यानंतर नवले समर्थकांनी एकनाथ शिंदेंच्या भूमिकेचे जाहीरपणे स्वागत केले असल्याने प्रा.सुरेश नवले शिंदेंच्या गटात सामील झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात विद्यमान जिल्हाप्रमुखांसह शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले असताना माजी मंत्री सुरेश नवले समर्थकांनी शिंदे गटाला साथ दिली आहे. प्रसिद्धीपत्रक काढून नवले मित्र मंडळाचे माजी नगराध्यक्ष शिवलाल मुळूक, सुधीर सुपेकर, बिभीषण चव्हाण, गणेश नवले आदींनी भूमिका जाहीर केली आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former minister prof suresh navale in eknath shinde group zws

ताज्या बातम्या