जालना – बारावी परीक्षेच्या वेळी केन्द्रांवरील विद्यार्थ्यांकडे कॉपी आढळली म्हणून हलगर्जीपणा केल्याबद्दल चार शिक्षकांना निलंबित करण्याचे आदेश माध्यामिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष आणि सचिवांसह मुख्याध्यापकांना दिले आहेत.
बारावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी १० फेब्रुवारी रोजी इंग्रजीच्या पेपरच्या वेळी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या भरारी पथकांस हा गैरप्रकार आढळून आला होता. अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालयातील आर. के. भालेराव आणि पी. बी. वाघ, बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथील छत्रपती संभाजी महाराज विद्यालयातील बी. ई. राव तसेच अंबड तालुक्यातील रोहीलागड येथील राजे शिवाजी महाराज विद्यालयातील एस.आर. जाधव या चार सहशिक्षकांच्या विरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. या चौघांना परीक्षेच्या कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल निलंबित करण्याचे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी खरात यांनी संबंधित शिक्षण संस्थांना कळविले आहे. तसेच कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘रेस्टिकेट’ करण्यात आले आहे.
अंकुशनगर येथील परीक्षा केंद्रास तहसीलदारांच्या भरारी पथकाने भेट दिली होती. त्यानंतर जिल्हाधिकारी तथा दक्षता समितीच्या अध्यक्षांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे वाकुळणी आणि रोहीलगड येथील परीक्षा केन्द्रांना अंबड येथील उपविभागीय दंडाधिकारी यांच्या भरारी पथकाने भेट दिली होती.
जिल्हयात बारावीच्या परीक्षा केन्द्रांची संख्या ७९ असून एकूण ३७ हजार ३८८ परीक्षार्थी आहेत. जिल्हाधिकारी आशीमा मित्तल यांनी प्रत्येक परीक्षेच्या प्रत्येक खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केलेले असून ते बंद अथवा निष्क्रीय आढळल्यास त्यासाठी संबंधित केन्द्र संचालकास जबाबदार धरण्यात येईल असा इशारा दिला आहे. जिल्हयातील आठ संवेदनशील परीक्षा केन्द्रांवर ड्रोन कॅमेऱ्याऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. सर्व केन्द्रांवर बैठे पथक नियुक्त करण्यात आले असून त्यांनी केवळ एका ठिकाणी बसून राहण्याऐवजी परीक्षा खोल्यांना भेटी द्याव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
