छत्रपती संभाजीनगर : रात्रीचे ११ वाजलेले. एकमेकांना चिकटून इंधन भरण्यासाठी उभ्या असणाऱ्या हजार रिक्षांची रांग. सकाळपासून ११ तास रिक्षा चालविणाऱ्या शेख रहेमान यांनी रांगेत रिक्षा लावून चार , साडेचार तास उलटलेले. इंधन तुटवडा नाही असा दावा सरकारकडून केला जात होता. त्या दिवशी त्यांचे कामाचे तास १५ तास. एवढा वेळ काम करुन मिळकत मात्र घटली होती. काही दिवसापूर्वी ६१ रुपयांनी मिळणारा गॅस आता ९० रुपयांपर्यंत वाढला होता. ३० रुपयांच्या इंधनाच्या वाढीने मनुष्यतास तर वाढलेच आणि महिन्याच्या १५ हजार रुपयांच्या मिळकतीमधून तीन हजार रुपयांची कपात झाली. इंधन मिळाले नाही तर उद्या शाळेत मुलांना कसे सोडू, असा त्यांचा प्रश्न वाढत जाणारी इंधन कोंडीची व्याप्ती सांगण्यास पुरेसा होता. रात्रीच्या ११ वाजता सारे रिक्षाचालक पेट्रोलपंप चालकास विनंती करत होते, काहीही करा पण सगळ्यांना गॅस भरुन द्या, उशिरापर्यंत रिक्षाची रांग वाढत होती.
इंधन तुटवड्याची आवई उठली आणि पेट्रोल पंपावर रांगा लागल्या. पेट्राेलच्या रांगा वाढल्या तर इंधन सर्वाना मिळणार नाही. पुरेसा साठा असूनही टंचाई निर्माण होईल म्हणून त्याचे काही जिल्ह्यात रेशनिंग सुरू झाले आहे. याच वेळी रिक्षांमध्ये ‘ सीएनजी ’ भरण्याची घाई सुरू झाली. दोन दिवसापासून त्यासाठी रांगा लागू लागली होती. शहरात ‘ गो गॅस ’ कंपनीचे केवळ दोनच पंप चालू असल्याने रिक्षाचालकांनी रांग लावलेली. एकदा गॅस भरला की चार – पाच दिवस इंधन पुरते., असे सय्यद तय्यब सांगत होते, त्यांचे सगळे कुटुंब हे त्यांच्या रिक्षा चालविण्यावर अवलंबून. दोन मुली, दोन मुले, आई आणि पत्नी. १० – १२ तासाचे काम केले तर खर्च वजा जाता सरासरी प्रतिदन ५०० रुपये पडतात. आता इंधनाचा खर्च वाढला आणि कमाई घटली.
महिनाभराची १५ हजार रुपयांची कमाई आता तीन हजार रुपयांनी घटली. गारखेड भागात राहणारे पुरुषोत्तम केसकर गेली २० वर्षे ऑटो रिक्षा चालविण्याच्या व्यावसायात. ते चार तासापासून रांगेत उभे होते. आज इंधन मिळाले नाही तर उद्या पुन्हा चार – पाच तास रांगेत उभे रहावे लागेल. मग धंदा कसा होणार ? त्यामुळे रात्रीतून इंधन भरणे गरजेचे. एका रिक्षात १२ लिटर गॅस भरला जातो. मग रिक्षा प्रतिलिटर सरासरी २० किलोमीटर चालते. आता युद्धाचा फटका इंधन दर वाढीवर झाल्याने रिक्षा चालकांचे कामाचे तास वाढले आहेत. त्यांचा बहुतांश वेळ रांगेत जातो आहे. तरुण मुकीब सय्यदने सकाळी ११ वाजता घर सोडले होते. रात्रीच्या ११ वाजता तो रांगेत सर्वात शेवटी होता. त्याला कधी पेट्रोल मिळेल हे कोणालाच सांगता येत नव्हतं. तो रात्रभर रांगेत उभा हाेता. उर्जा कमी पडली की संसराला कात्री लावावी लागते आहे, त्यात अर्थसाखळीतील शेवटचा माणूस होरपळतो आहे.
