परभणी : खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ गंगाखेड शहरात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने शुक्रवारी (दि.१९)तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या नेतृत्वात खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. पाथरी येथेही जिल्हाप्रमुख रवींद्र यांच्या नेतृत्वाखाली खासदार जाधव यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
गंगाखेड येथील आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासदार जाधव यांनी सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. जनतेच्या मतांवर निवडून येऊन पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत, अशा भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख माधव शेंडगे, उपजिल्हाप्रमुख साहेबराव कल्याणकर, बाळासाहेब लोखंडे, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब राखे, माधवराव देसाई, गंगाखेड तालुकाप्रमुख जानकीराम पवार, पालम तालुकाप्रमुख बापूराव पोळ आदींसह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
शुक्रवारी(दि. २९) पाथरी तहसिल कार्यालयासमोर खासदार जाधव यांच्या भूमिकेविरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांनी निषेध आंदोलन केले.शहरातून मोर्चा काढत तहसिलसमोर खासदार जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन केले. व गद्दारी खपवून घेणार नाही अशा घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांच्यासह कल्याणराव रेंगे, मुंजाभाऊ कोल्हे, हरिभाऊ वाकणकर, आत्माराम वाघ, रंजित गिराम, रावसाहेब निकम, तुकाराम हरकळ, सत्यनारायण घाटुळ, माऊली गलबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तहसिलसमोर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, बाळासाहेबांची विचारधारा सोडून सत्तेच्या जवळ जाणाऱ्यांचा आम्ही निषेध करत असून जनतेचा विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना लोकशाही मार्गाने जाब विचारला जाईल.
