छत्रपती संभाजीनगर : घरोघरच्या भाज्यांना चवीचा स्वाद देणाऱ्या लसणाची फोडणी महागली आहे. मध्य प्रदेशासारख्या राज्यातून होणारी आवकही मंदावली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जाधववाडी उच्चतम बाजार समितीमध्ये २ जुलै रोजी केवळ ३८ क्विंटल लसणाची आवक झालेली होती. सुमारे १७ लाखांच्या आसपास लोकसंख्या असलेल्या शहरासाठी ही आवक फारच कमी मानली जात आहे. तर दरही किमान २ जुलै रोजी कमाल दर २९ हजार रुपये क्विंटल तर किमान दर १४ हजार रुपये होता. सर्वसाधारण दर २१ हजार रुपये एवढा मिळाला होता. तर ४ जुलै राेजी आवक वाढली हाेती.
शनिवारी ५४ क्विंटल लसणाची आवक झाली हाेती. यावेळी दर किमान ६ हजार, कमाल दर १८ हजार तर सर्वसाधारण दर १२ हजार रुपये क्विंटलचा मिळाला, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले. लसणाची आवक घटल्याने दरामध्ये तेजी आलेली आहे. दर २५० ते ३०० रुपये किलोपर्यंत पोहोचले असून, १ जुलै रोजी केवळ २७ क्विंटल आवक झाली. तर कमाल दर १७ हजार रुपये मिळालेला होता.
बाजार समितीतील लसणाचे व्यापारी वाजेदखान यांनी सांगितले की, दररोज जिथे दहा ट्रक माल यायचा तिथे आता पाच किंवा सातच ट्रक माल येत आहे. एका ट्रकमध्ये सात ते दहा टन माल येतो. छत्रपती संभाजीनगर येथील बाजार समितीमध्ये मध्य प्रदेशातील इंदोर, रतलाम आदी भागांतून लसणाची आवक होते. गावरान लसणाचा दर अडीचशे रुपयांपर्यंत आहे. सर्वसाधारण लसणाचा दर दीडशे ते अडीचशे रुपयांपर्यंत आहे.
शेतकरी एकनाथ अनंतपुरे यांनी लसणाच्या दरातील तेजी ही मंदीनंतरचा परिणाम असल्याचे सांगितले. मागील तीन वर्षांपासून लसणाचे दर शंभर रुपयांच्या आतच होते. शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याचा परिणाम क्षेत्र घटण्यावर झाला. तीन वर्षांनंतर मंदीनंतर तेजी येते, या अर्थचक्रातील फेऱ्यानुसार लसणाचेही दर वाढलेले आहेत. लसणाची लागवड साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होते. त्याला अधिक पाऊस आणि ऊनही चालत नाही. गतवर्षी अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्याचा फटका लसणाच्या पिकाला बसलेला असणार. लसूण हे पीक घरातही दीर्घकाळ ठेवता येणारे नसल्याने शेतकरी बाजारात नेऊन विक्री करतो. शेतकऱ्यांकडे माल नाही आणि आता हंगामही नसल्याने बाजारातील आवक घटल्याचे चित्र आहे.
