छत्रपती संभाजीनगर – सकाळची पार्टी म्हणजे नाश्ता म्हणून खाऊ घालण्याचा किंवा स्वतःहून खायला जाण्याचा पदार्थ असलेला डोसा पुढचे एक-दोन दिवसच चव चाखायला मिळतो की काय, असे चित्र खाऊगल्ली क्षेत्रातील परिस्थिती सांगते आहे. डोसासाठी कायम ठेवावा लागणारा तप्त तवा इंधनाअभावी थंड करून बाजूला ठेवावा लागणार असून, उडपी खाद्य संस्कृती प्रकारातील नाश्ता दुकानांची शटर खाली ओढावी लागण्याच्या चिंतेने व्यावसायिकांना घेरले आहे.

शहरामध्ये अनेक ठिकाणी १० रुपयात इडली, २० ते ५० रुपयांत डोसा मिळण्याची हाॅटेल्स दिसून येतात. काही प्रमुख चौक तर असे आहेत की, त्या ठिकाणी इडली-डोसाचे हाॅटेल नाही, असे चित्र दिसणार नाही. अशा हाॅटेल्सची सर्व मदार ही कमर्शिअल गॅस सिलिंडरवर असून, सध्या नेमका त्याचा तुटवडा जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे. पश्चिम आशियात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे देशातील एलपीजी गॅस पुरवठ्यातील तुटवडा नियंत्रित करण्यात आल्याचा दावा केंद्र सरकारकडून करण्यात आला असला तरी आणि एलपीजीचे देशांतर्गत उत्पादन वाढवून घरगुती ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देण्यावर केंद्र सरकारचा भर असला तरी व्यावसायिक सिलिंडरच्या बाबतचे चित्र काहीसे चिंता वाढवणारे असल्याचे हाॅटेलचालकांचे म्हणणे आहे.

शहरातील काही प्रमुख हाॅटेल्सचालकांशी संवाद साधला असता त्यांनी एक ते दोन दिवस पुरेल, एवढाच व्यावसायिक सिलिंडरचा साठा उपलब्ध असून, दोन दिवसांनंतर शटर खाली खेचावे लागण्याशिवाय पर्याय नाही, असे सांगून चिंता व्यक्त केली आहे. शहराच्या प्रमुख आणि मध्यवर्ती भागामध्ये दादा डोसा ब्रॅण्डची अनेक हाॅटेल्स आहेत. त्यात आैरंगपुरा-गुलमंडी, पैठण गेट, टिव्ही सेंटर, पुंडलिकनगर, जालना रोड, अशा काही प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे. या ठिकाणच्या एका हाॅटेलवर विचारणा केली असता गॅसचा सध्या तुटवडा भासत असल्याचे सांगण्यात आले. दोन दिवसांनी डोसा मिळेल का नाही सांगता येणार नसून, उर्वरीत इडली, मेदू वडा, अशा पदार्थांवरच हाॅटेल्स चालवावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.

सध्या भागवा-भागवी सुरू

सध्या भागवा-भागवी सुरू आहे. काटकसरीने वापर असला तरी डोसासाठी मोठा तवा तप्त ठेवावा लागतो. त्यासाठी गॅस सिलिंडर सुरूच ठेवणे गरजेचे असते. दुकानाचा ब्रॅण्डच डोसा असल्याने डोसा खाण्यासाठी येणाऱ्यांची संख्या लक्षणीय असते. सध्या शहरातील नऊपैकी एक हाॅटेल बंद ठेवले आहे. रोशनगेट मार्गावरील हाॅटेल रमजानच्या महिन्यामुळे बंद ठेवले आहे. उर्वरीत आठ हाॅटेल्स सुरू आहेत. परंतु डोसा तयार करण्यासाठी सिलिंडरची अंतर्गत यंत्रणेमार्फत व्यवस्था करावी लागते आहे. येत्या दोन दिवसांनंतरची परिस्थिती नेमकी काय सांगता येणार नाही. – रेहान पटेल, व्यवस्थापक, दादा डोसा.