छत्रपती संभाजीनगर : जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात देशविघातक आणि देशाला रसातळाला नेण्याच्या इच्छा असणारे राजकीय गुंड सहभागी झाले. त्याला राहुल गांधींनी साथ दिली. हे ‘क्रॉकोच’ला कळणार नाही. ते कधीच कर्नाटक, पंजाब, केरळ येथील सरकारच्या कारभारावर बोलत नाहीत. विदेशी शक्ती या सर्वांना खेळवताहेत. कारण अनेकांना देशात झालेली प्रगती बघवत नाही, अशा शब्दात वस्त्रमंत्री गिरिराज सिंग यांनी कॉग्रेस आणि काक्रोच जनता पक्षावर टीका केली. ‘सीसीआय’च्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर गिरिराज सिंग पत्रकारांशी बोलत होते.
‘ देशात मोठ्या प्रमाणात रस्ते झाले. रेल्वेच्या विद्युतीकरणाची मोठी कामे झाली. वंदे भारत सारखी दळणवळणाची आणि पायाभूत सुविधांची कामे झाली. अगदी थेरियमच्या आधारे अणुशक्तीचे प्रयोगही आता पूर्णत्वाकडे जाऊ लागले आहेत. ही देशाची प्रगती न बघवणाऱ्यांनी जंतरमंतर आंदोलनात सहभाग घेतला. जेव्हा आंदोलन सुरू होते तेव्हा राहुल गांधी परदेशी दौरे करत होते. या आंदोलनाही कतार आणि बांगलादेशातून पैसा आल्याची चर्चा होती. पण केवळ आपण वाचले आहे. याची चौकशी विभाग त्याचा त्याचा विभाग करेल.’ असेही गिरिराज सिंग म्हणाले.
संसदेसमोर कॉग्रेस नाटक सहनशक्तीलाच आव्हान
राममंदिरातील दानपेटीतील चोरी प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यात आली आहे. यातील दोषी कर्मचारी सरकारने पकडले आहेत. तरीही संसदेसमोर एक नाटक उभे करण्यात आले आणि राहुल गांधी त्यात एक पात्र बनले. हा हिंदूच्या भावनांचा अपमान आहे. हाच प्रकार मुस्लिम धर्मियांच्या किंवा खिश्चनांच्या बाबतीत तुम्ही करू शकला का, असा सवाल गिरिराज सिंग यांनी उपस्थित केला. आता हिंदूच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. आमचीही शक्ती संपत चालली आहे.
