छत्रपती संभाजीनगर : उद्योजक संतोष लड्डा यांच्या बजाजनगरातील घरात १५ मे रोजी पडलेल्या दरोड्यात साडे पाच किलो सोने व ३२ किलो चांदी चोरून नेण्यात आली होती. या प्रकरणाचे धागेदोरे बुधवारी नांदेडशीही असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या गुन्हे शाखेने गुरुवारी सराफा व्यावसायिकासह चौघांना अटक केली आहे. शेख अबुजर उर्फ शाहिद (वय २३), शेख सोहेल शेख मुस्तफा (२६, रा. दोघेही अंबाजोगाई), शेख शाहरुख शेख रफिक व सराफा व्यावसायिक आशिष जयकुमार बाकलीवाल (वय ४२, दोघेही रा. नांदेड) अशी अटक आहेत.
आरोपी बाकलीवालकडून १९४.०१० ग्रॅमं वजनाची सोने लगड जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली. चारही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
बाकलीवालसोबतचे निछे मुख्य आरोपी असलेल्या सुरेश गंगणेचे जवळचे साथीदार आहेत. सुरेश गंगणे याने दरोड्यातील त्याच्या वाटेचे सोने पत्नी बबिता व सासऱ्याला दिले. उर्वरीत सोने सुरेशने अंबाजोगाईतील साथीदार शेख सोहेल याच्याकडे दिले. सोहेलने शेख शाहरुख व शेख अबुजर यांच्या मदतीने सराफा व्यावसायिक आशिष बाकलीवाल याला विकल्याचे चौकशीत सांगितले. त्यावरून पोलिसांनी वरील चौघांना बुधवारी ताब्यात घेऊन छत्रपती संभाजीनगरमध्ये आणले. चौकशीत दरोड्याच्या गुन्ह्याशी चौघांचेही धागेदोरे मिळत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गुरुवारी रात्री अटक दाखवली.
या घटनेप्रकरणी आतापर्यंत १६ आरोपी निष्पन्न झाले असून, अमोल खोतकर हा २७ मे रोजी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. तर बाळासाहेब चंद्रकांत इंगोले हा आरोपी उद्योजक संतोष लड्डा यांचा जवळचा मित्र होता.बाळासाहेब इंगोले हा संतोष लड्डा यांचा गावकरी म्हणजे अंबाजोगाईचा रहिवासी आहे. शिवाय वर्गमित्र होता. तो २००६ पासून लड्डा यांच्या कंपनीत काम करत होता. डिसें २०२४ मध्ये कंपनी मॅनेजरशी इंगोलेचा वाद होता. या वादातून इंगोले याने मॅनेजरला शिवीगाळ केली होती. याचा बदला म्हणून इंगोलेने दरोड्याचा कट रचल्याचा अंदाज आहे.