Caste and Google Searches: एखादा शब्द ‘गुगल’वर टाकला, की त्या शब्दाचा भोवताल लोक कसा शोधत आहेत, हे सांगणारे सूचक शब्दार्थ जोडून त्यांची एक संगती समोर आणून ठेवली जाते. या संगतीमध्ये अलीकडच्या काळातील कल मोठा विलक्षण आणि एक विदारक वास्तव सांगणारा आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मुलगा डोंगराच्या कड्यावर थांबतो. त्याने आत्महत्या करू नये म्हणून त्याचे वडील आणि आई तिथे येतात. मुलाला समजावताना मुलगा आणि वडील हे दोघेही डोंगरावरून पडतात. काही क्षणांत घडलेल्या या घटनेत मुलाची आईही डोंगरावरून उडी मारते. तिघांचा मृत्यू होतो. या तीन माणसांच्या मृत्यूची कारणे शोधणारी मंडळी मग प्रत्येक बाजू तपासायला सुरुवात करतात. खूप जण वेगवेगळे अर्थ लावतात. पण या शोधात गुगलकडून एक कलही दाखवला जात होता. तो कल दाखवणारा प्रश्न होता – मृत मुलाच्या आईची जात कोणती होती? मृत्यूनंतरच्या शोधात जातीचे संदर्भ का तपासले जात असतील? आपली हळहळ किंवा संवेदना आरोपी किंवा मृत व्यक्ती कोणत्या जातीचा आहे, यावर ठरली जाऊ लागली आहे का? गुगलची शब्दसंगती तर तेच सुचवते आहे.

संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर बीडमध्ये जातवास्तव दृश्य स्वरूपात जाणवू लागले. अगदी एकमेकांच्या दुकानातून माल खरेदी करायचा की नाही, येथपर्यंत ती मजल गेली. जातीचे हे गणित एवढे खोलवर रुजले, की शहरात शिकण्यासाठी एकत्र राहणारे विद्यार्थीही सजातीय मित्र शोधू लागले. जात पाहण्याची ही वृत्ती कमी व्हावी म्हणून काही जाणीवपूर्वक प्रयत्नही केले गेले. आडनावावरून जात कळते, हे वास्तव पोहोचू नये म्हणून किमान पोलीस दलातून नावपट्टीवर आडनाव काढून टाकण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम हळूहळू दिसू लागला. पण आजही आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा-ओबीसीमधील तेढ आतमध्ये तशीच खदखदते आहे. पुढे गुन्हा घडला की जात पाहण्याची जणू छंदच जडला आहे की काय, असा प्रश्न पडावा असे वातावरण निर्माण झाले. प्रयागराजच्या कुंभमध्ये ‘मोनालिसा’ प्रसिद्धीस आली तेव्हाही हाच जात शोधणारा कल दिसून आला होता. गौतमी पाटील हिच्या आडनावातील पाटील शब्द आला कसा, याचाही शोध अनेक दिवस गुगलकडेच विचारला जात होता. आता बीडच्या विलास घुले प्रकरणातही ती जातीची किनार कायम आहे. फलटणमध्ये डॉक्टरच्या मुलीच्या आत्महत्येनंतरही जात शोधली गेली. आता प्रत्येक गुन्ह्यात हळहळ व्यक्त करताना जातीचा निकष लागतो आहे का? – उत्तर सकारात्मक आहे.

माणसे जात शोधतात…

कोपर्डीच्या घटनेनंतर आरक्षणाची चर्चाच बंद होऊ नये असे प्रयत्न जाणीवपूर्वक केले गेले. यामागे असणारे जातवास्तव आणि गुगलच्या शोधाचे इंजिन याचे संबंध लावले की महाराष्ट्राची प्रगतीसुद्धा कशी जातीयवादी बनली आहे, हे समजून येईल. खरे मराठवाडा अधिकाधिक जातीयवादी केला गेला, की तो मुळातच जातीयवादी आहे? प्रत्येक बाबतीत जात शोधण्याची वृत्ती आता गुगल शोध इंजिनला कळाली आहे. त्यामुळे ही माणसे जात विचारणार, ही संगती यंत्राने पूर्णतः पकडली आहे. पण प्रश्न असा की, आपल्या संवेदना घटनेतील क्रूरता, त्या कुटुंबावर ओढावलेली परिस्थिती यावर अवलंबून आहेत, की तो किंवा ती व्यक्ती आपल्या जातीची असेल तर ते दुःख अधिक, अशी मानसिकता होऊ लागली आहे. आता दुःखाला जातीचा आधार दिला जात आहे.

मराठवाड्यात जातवास्तव नेहमीच ठळकपणे व्यक्त होत गेले होते. पूर्वी जेव्हा मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न हाती घेतला गेला, तेव्हा तो वाद दलित-सवर्ण असा होता. आजही तो आहेच. अभिजीत दिपके हा जंतरमंतरवर येणार, हे जाहीर होताना आणि तो विमानातून उतरल्यानंतर त्याची जातही आवर्जून सांगितली जात होती. ॲड. प्रकाश आंबेडकरांनी जातीचा उल्लेख करून मिळणाऱ्या प्रतिसादाचा लेखाजोखा मांडणारे एक विधान मध्यंतरी चर्चेत होते. दिपकेच्या प्रश्नांना सोनम वांगचूक यांच्या उपोषणामुळे धार येत गेली. प्रतिसाद वाढत गेला. अनेकार्थांनी भारतीयांची कोंडी फुटली. सरकारविरोधाचा रोष सर्जनशीलपणे व्यक्त होत गेला. एका मोठ्या यशामुळे महाराष्ट्राच्या मनात असणारा दिपके यांच्या जातीचा प्रश्न काहीसा मागे पडला. पण तो प्रश्न महाराष्ट्राची जातीयवादी जडणघडण अधिक कट्टर बनत चालली असल्याचे ते लक्षण आहे. समाजमाध्यमांमध्ये जातीचे गट आहेत. तो गट जातीची संख्या किती आहे आणि ‘व्यवहारातील’ सुलभतेसाठी जपण्यासाठी वापरला जातो आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रत्येक जातीचा झेंडा तसेच त्याचे ‘पेज’ या संकल्पनेला खतपाणी घातले गेले. प्रश्न काय आहे आणि सोडवणुकीसाठी काय करायला हवे, हे तपासण्याऐवजी प्रश्न कोण विचारतो आहे आणि त्याची जात काय, असा दृष्टिकोन पूर्णतः विकसित झाला आहे. याही पुढे जाऊन मृत आणि गुन्ह्यातील आरोपीची जात पाहून दुःखाची तीव्रता कमी-जास्त केली जात आहे. असेही आडनाव ऐकल्यावर लोक व्यवहार बदलतात. बोलण्यातले टाळण्याचे मुद्दे ठरवले जातात. आता आडनावावरून जात कळत नसेल तर गुगलची मदत घेतली जात आहे. हे निकष आता गुन्हे आणि मृत्यूनंतरच्या घटनांमध्येही तपासले जात आहेत. एवढे दिवस आरक्षणाच्या लाभासाठी जात तपासणे साहजिक मानले जात होते. आता त्याची व्याप्ती अधिक वाढली आहे.

छावा, शिवा यांसारख्या संघटना असतील किंवा शिवसंग्रामसारखी संघटना असेल. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मराठा महासंघ मराठवाड्यात अधिक सक्रिय होत्या. ब्राह्मण सभांची अधिवेशनेही मराठवाड्यात दणक्यात झाली होती. परशुरामाची जयंतीही मोठी होत जात आहे. जात वाढते आहे. आता त्याला तंत्रज्ञानाची जोड आहे. खूप साऱ्या जाती, त्यांचे खूप सारे गट. त्याचे वर्गीकरण-उपवर्गीकरण सारे काही आहे समाजमाध्यमी. म्हणूनच जे आडनाव ओळखता येत नाही, ते गुगलला विचारण्याची वृत्तीही वाढते आहे. एकाच वेळी आपण प्रगत आणि अश्मयुगीन काळात जगत असतो, हेच खरे. आता अश्मयुगीन आणि मध्ययुगीन कालखंडातील रानटीपणा आपण ‘गुगल’जवळही व्यक्त करतो आहोत. आपण प्रगतीच करतो आहोत, नाही का?