नांदेड : अध्यापन आणि प्रशासकीय कामांच्या जबाबदार्‍या पार पाडताना तसेच निवृत्तीनंतरही ज्ञानसाधनेत अखंड रमलेले राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद गणाजी नांदेडे यांनी गेल्या पाच दशकांत प्राप्त केलेल्या मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदव्या आणि पदविकांची ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्स’ने नोंद घेतली असून त्यांच्या या उच्चांकाबद्दल प्रमाणपत्रही जारी केले आहे. नांदेडे हे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातल्या शिराढोण या छोट्याशा गावाचे भूमिपुत्र. १९७०च्या दशकाच्या अखेरीस शालेय शिक्षण आणि १०वीच्या पुढचा डी.एड.चा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांनी पुढील दहा वर्षे नांदेड जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक स्तरावर अध्यापन केले.

या नोकरीदरम्यान त्यांनी प्रथम कला शाखेची पदवी प्राप्त केली. तेथून सुरू झालेला त्यांचा ‘परीक्षार्थी’चा प्रवास अद्यापही थांबलेला नाही.
दहा वर्षे अध्यापन केल्यानंतर नांदेडे यांना पुण्याच्या बालभारतीत विशेष अधिकारी ह्या पदावर प्रथम संधी मिळाली. नंतर ते वसमत येथे गट शिक्षणाधिकारी आणि मग थेट शिक्षणाधिकारी झाले. नोकरीच्या शेवटच्या काळात त्यांना शालेय शिक्षण विभागाच्या संचालकपदी बढती मिळाली होती. याच पदावरून ते आठ-नऊ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले.

नांदेड, उस्मानाबाद, लातूर, पुणे आदी ठिकाणी नोकरी करताना त्यांनी वेगवेगळे उपक्रम आणि अभियानही राबविले होते. प्रशासकीय जबाबदार्‍या पार पाडत असताना वेगवेगळ्या विद्यापीठांतील वेगवेगळ्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याचा, त्या-त्या विषयांचा अभ्यास करून परीक्षा देण्याचा परिपाठ त्यांनी कधीच सोडला नाही. शासकीय नोकरीमध्ये असताना मी दरवर्षी कोणती न् कोणती परीक्षा देतच होतो, असे त्यांनी आपल्या विक्रमी कामगिरीनंतर सांगितले. नांदेडे यांच्याकडील पदवी आणि पदविकांची संख्या ३८ झाली आहे.

त्यात वेगवेगळ्या विद्यापीठांच्या ३१ पदव्यांचा समावेश आहे. सेट आणि नेट ह्या दोन्ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा आणि संत गाडगेबाबा या दोन विद्यापीठांतून त्यांनी शिक्षणशास्त्र व मराठी विषयात पीएच.डी. पदवी प्राप्त केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये मागील शतकात माजी गृह व अर्थराज्यमंत्री डॉ.श्रीकांत जिचकार यांनी वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर शिक्षणानंतर वेगवेगळ्या अभ्यासक्रमांच्या पदव्या प्राप्त करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. विधी व व्यवस्थापन या शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून डॉ.जिचकार यांनीही विविध विषयांमध्ये एम.ए. केले. संस्कृत भाषेवर त्यांचे विलक्षण प्रभुत्त्व होते. यूपीएससीद्वारे प्रशासकीय सेवेसाठी निवड झालेली असतानाही जिचकार राजकारणात आले. आधी आमदार आणि मग मंत्री झाले.

नांदेडे यांनी पदव्या आणि पदविकाप्राप्तीच्या बाबतीत डॉ.जिचकार यांनाही मागे टाकले आहे. एम.ए. मराठीसह अनेक परीक्षांमध्ये त्या-त्या विद्यापीठांमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान प्राप्त करून त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले. त्यांनी वयाची पासष्टी दोन वर्षांपूर्वीच ओलांडली, तरी त्यांच्या अभ्यास-अध्ययनात खंड पडलेला नाही. आजही ते काही विषयांचा अभ्यास करत आहेत. पुढील काळात पाली भाषा तसेच बौद्ध विचार या विषयांमध्ये एम.ए. करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

आपल्या ज्ञानसाधनेची नोंद योग्य त्या व्यासपीठावर व्हावी, यासाठी त्यांनी ‘लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडर्स’कडे आवश्यक त्या दस्तऐवजांसह प्रस्ताव पाठविला होता. त्याची नोंद घेऊन या संस्थेने गेल्या महिन्यात सर्वाधिक पदव्या प्राप्त केल्याबद्दल नांदेडे यांच्या नावाने प्रमाणपत्र जारी केले आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण यशाबद्दल नांदेडमधील अनेक हितचिंतकांनी नांदेडे यांचे अभिनंदन केले आहे. हा सन्मान त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा सुवर्णमुकुट असल्याची भावना शिक्षण विभागाचे निवृत्त अधिकारी-साहित्यिक व्यंकटेश चौधरी यांनी येथे व्यक्त केली.