औरंगाबाद – तब्बल ६७ कोटींच्या  खरेदीची बोगस बिले वापरून त्याद्वारे १२ कोटी रुपयांचा इनपुट टॅक्स क्रेडिट निर्माण करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी २ व्यक्तींना २९ जून रोजी अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद वस्तू व सेवाकर अन्वेषण विभागाने ही कारवाई केली आहे. फसवणूक व करचोरीच्या विरोधात महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने आक्रमक मोहीम राबवली आहे. या मोहिमेचा भाग म्हणून औरंगाबाद येथील ॲल्युमिनियम स्क्रॅपच्या दोन व्यवसायिकांकडे अन्वेषणपर छापे टाकण्यात आले.. मे. एस. आर. मेटल आणि मे. ढोअर्स वर्ल्ड या दोन फर्मचे मालक अनुक्रमे समीर चौधरी व मनोज व्यास यांना अटक करून प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांचे समोर हजर करण्यात आले. सदर व्यवसायिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. नाशिक क्षेत्रातील जीएसटी कायद्यांतर्गत अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असल्याचे विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणात मालाची कोणतीही वाहतूक न करता बनावट ई-वे बिल तयार केल्याची बाब देखील वस्तू व सेवाकर विभागाच्या लक्षात आली आहे. या इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळ्याचे अन्वेषण वस्तू व सेवाकर विभागाद्वारे सुरू असून सदर व्यावसायिकांच्या खरेदी व विक्रीच्या व्यवहारांची सखोल तपासणी अन्वेषण विभाग करत आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gst dept arrested two persons for fake bills of rs 67 crore zws
First published on: 30-06-2022 at 19:53 IST