हिंगोली: एका सामान्य इलेक्ट्रिक दुकानदाराच्या आधार व पॅन क्रमांकाचा गैरवापर करून परराज्यात बनावट कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीच्या माध्यमातून १०५ कोटींची उलाढाल दाखवण्यात आली. या उलाढालीच्या आधारे २३ कोटींची वस्तू व सेवा कराची नोटीसही पाठविण्यात आली आहे. वसमतमधील या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
वसमत शहरातील इलेक्ट्रिक व्यवसाय करणारे राजेश माधवसा दुमाने यांना अचानक २३ कोटी रुपयांची वस्तू व सेवा कर भरण्याची नोटीस प्राप्त झाल्यानंतर हा बनावट कंपनी स्थापन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अल्प उत्पन्नावर चालणाऱ्या त्यांच्या छोट्या व्यवसायाच्या तुलनेत एवढी प्रचंड कर मागणी झाल्याने दुकानदार चक्रावले. त्यांनी तत्काळ वस्तू व सेवा कार्यालयात धाव घेत चौकशी केली. तेव्हा त्यांच्या नावावर परराज्यात कंपनी नोंदवून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे समोर आले. या चौकशी दरम्यान एका भामट्याने दुमाने यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड, फोटो व जीएसटी क्रमांकाचा गैरवापर करून तेलंगणा राज्यातील मियापूर (हैदराबाद) येथे फ्लॅट क्रमांक १०२, प्लॉट ६७ डी, अशोक शर्मा हरीनिवास अपार्टमेंट या पत्त्यावर बनावट कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून २९ जुलै २०२३ ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत तब्बल १०५ कोटी ७९ लाख ४ हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे दाखवण्यात आली.
या व्यवहारांच्या आधारे दुमाने यांच्या नावावर २३ कोटी ३० लाख रुपयांची जीएसटी थकबाकी दर्शवण्यात आली. एवढेच नव्हे, तर संशयास्पद व्यवहारांमुळे त्यांच्या वसमत येथील स्टेट बँक ऑफ इंडिया खाते गोठवण्यात आले. या प्रक्रियेनंतर दुमाने यांना फसवणुकीचा उलगडा झाला. त्यानंतर २८ मार्च रोजी वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मात्र, गुन्ह्याचे मूळ केंद्र तेलंगणातील मियापूर येथे असल्याने पुढील तपास तेथील पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. अचानक आलेल्या संकटामुळे व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांच्या वैयक्तिक कागदपत्रांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवासादरम्यान किंवा विविध कारणांसाठी कागदपत्रांच्या प्रती देताना होणारी निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो. आधार, पॅन, बँक तपशील यांसारखी संवेदनशील माहिती कोणालाही देताना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
