छत्रपती संभाजीनगर – मराठवाड्यासह महाराष्ट्रभर चर्चेत असलेल्या ‘ज्ञानराधा मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड’च्या ३ हजार ५०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी झाली असून, न्यायाधीश एन. बी. सूर्यवंशी आणि न्यायाधीश आबासाहेब डी. शिंदे यांनी केंद्र सरकार, महाराष्ट्र शासन आणि इतर संबंधित प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. याप्रकरणी ठेवीदारांनी ‘बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स ॲक्ट, २०१९’ ( बीयूडीएस ॲक्ट) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि विशेष न्यायालयांच्या स्थापनेसाठी रिट याचिका दाखल केली आहे.
ज्ञानराधा मल्टी-स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने ठेवीदारांच्या मुदत ठेवींची (फिक्स डिपॉझिट) मुदत संपल्यानंतरही परतावा न दिल्याने महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये सुमारे ३ हजार ५०० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. या प्रकरणी राहुल सुभाषराव सोनटक्के आणि इतर १३२ ठेवीदारांनी (एकूण १३३ याचिकाकर्ते) ॲड. युवराज बारहाते यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेतली आहे. हे ठेवीदार बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद आणि अहमदनगर या जिल्ह्यांतील रहिवासी असून, यामध्ये छोटे व्यावसायिक, शेतकरी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ज्यांचे कष्टाचे पैसे या सोसायटीत अडकले आहेत.
केंद्र सरकारने २०१९ मध्ये ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि बेकायदेशीर ठेव योजनांवर बंदी घालण्यासाठी बीयूडीएस कायदा लागू केला. या कायद्यानुसार: कलम ७ नुसार राज्य सरकारने मालमत्तेची जप्ती आणि व्यवस्थापन करण्यासाठी ‘सक्षम प्राधिकारी नियुक्त करणे अनिवार्य आहे. कलम ८ नुसार जप्त केलेल्या मालमत्तेची विक्री करून ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ‘विशेष न्यायालयांची’ स्थापना करणे बंधनकारक आहे. याचिकाकर्त्यांच्या मते, महाराष्ट्र सरकारने अद्याप या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केलेली नाही, ज्यामुळे ठेवीदारांना न्याय मिळण्यास विलंब होत आहे.
याचिकेत उच्च न्यायालयाकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये बीड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर आणि इतर प्रभावित जिल्ह्यांसाठी बीयूडीएस कायद्याच्या कलम ७ अंतर्गत तातडीने ‘सक्षम प्राधिकारी’ नियुक्त करण्यात यावा. तसेच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या सल्ल्याने बीयूडीएस कायद्याच्या कलम ८ अंतर्गत ‘विशेष न्यायालय’ स्थापन करावे, ज्यामध्ये जिल्हा व सत्र न्यायाधीश स्तरावरील अधिकारी आणि पुरेसा कर्मचारी वर्ग असावा.
तिसरी मागणी या प्रक्रियेसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाने आवश्यक निधी आणि अर्थसंकल्पीय तरतूद तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी तर चौथ्या मागणीनुसार केंद्र सरकार आणि सहकार मंत्रालयाने या कायद्याच्या अंमलबजावणीवर थेट नियंत्रण ठेवावे. न्यायालयाने याचिकेची दखल घेत प्रतिवादींना नोटीस जारी केली आहे. केंद्र सरकार, राज्य शासन आणि इतर प्रतिवादींच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी निश्चित करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने वकील युवराज आर. बारहाते हे कामकाज पाहत आहेत.
