शिवसेनेची कोंडी करण्याची भाजपची व्यूहरचना ; सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबादमध्ये हंडा मोर्चा 

शहराचा नामांतराचा मुद्दा आणि पिण्याचे पाणी असे ‘राजकीय मिश्रण’ शिवसेनेच्या विरोधात वापरण्याची रणनीती आखण्यात आली आहे

औरंगाबाद : एका बाजूला संभाजीनगर तर दुसरीकडे सर्वसामान्यांशी निगडित पाण्याच्या मुद्दय़ावर भाजपने औरंगाबादेत शिवसेनेला घेरण्याची व्यूहरचना आखली आहे. औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच उडवून लावल्याचे दिसल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आता संभाजीनगर विसरा, असे म्हणत शिवसेनेला डिवचले आहे.

शहराचा नामांतराचा मुद्दा आणि पिण्याचे पाणी असे ‘राजकीय मिश्रण’ शिवसेनेच्या विरोधात वापरण्याची रणनीती आखण्यात आली आहे. शहराचे नाव संभाजीनगर करण्याची गरज काय? आम्ही ते आधीच केले आहे. संभाजीनगरच म्हणतो आम्ही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंबईतील जाहीर सभेत स्पष्ट केल्यामुळे औरंगाबाद शहराचे नाव सरकारदरबारी बदलले जाईल काय, यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. शहराचे नाव बदलण्याचे पूर्वी दिलेले प्रस्ताव आणि त्याची कागदपत्रे अजूनही कायदेशीररीत्या वैध आहेत काय, याची माहिती सध्या उपलब्ध नाही. करोना साथ येण्यापूर्वी विभागीय आयुक्तांनी नामांतराबाबतचा एक प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. त्यानंतर या अनुषंगाने काहीही घडले नाही. आता संभाजीनगर करण्याची गरज काय? ते नाव आम्ही आधीच दिले आहे असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका भाजपच्या पथ्यावर पडली. फडणवीसांनी आता संभाजीनगर विसरा असा शिवसेनेला टोला लगावला.

राज्य सरकारने नवा प्रस्ताव पाठवला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शहराच्या नामकरणाबाबत अनुकूल निर्णय घेतले जातील, असे केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटले आहे. एकूणच  शिवसेनेला घेरण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. संभाजीनगरचा मुद्दा ध्रुवीकरणाच्या पारडय़ात आणि त्यात पाण्याच्या मुद्दय़ाची भर टाकत भाजपच्या वतीने २३ मे रोजी हंडा मोर्चा काढण्याचे ठरविले आहे. महापालिकेत सत्तेत शिवसेना आणि भाजपची युती असताना मोठा भाऊ म्हणून बहुतांशी निर्णय शिवसेना घेत असे. तुलनेने दुय्यम खाती आणि निर्णयात होला हो म्हणण्यापलिकडे भाजपने फारशी भूमिका वठविलेली नाही. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस झाल्यानंतरही महापालिकांतील निर्णयांमध्ये शिवसेनेचाच वरचष्मा असे. त्यामुळे पाण्याबाबत चुकलेल्या निर्णयाचे अपश्रेय शिवसेनेच्या पारडय़ात पडावे तसेच शिवसेनेचे हिंदूत्व हे भेसळयुक्त आहे अशी त्याची प्रतिमा निर्माण करावी, अशी व्यूहरचना भाजपचे नेते आखत आहेत. त्याचाच भाग म्हणून २३ मे रोजीच्या मोर्चात किमान २० हजार जण सहभागी होतील, असे नियोजन केले जात आहे. महिलांनी हंडा घेऊन मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपने केले आहे. पाण्यावरून शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आता जलयात्रा सुरू केली आहे. एमआयएमकडूनही पाणीप्रश्नी शिवसेनेला घेरण्याची तयारी सुरू केली आहे. शहराला पाणीपुरवठा करण्याची योजना नीटपणे अंमलबजावणीत आणण्यात राज्य सरकारलाही अपयश येत आहे असे चित्र राजकीय पटलावर उभे राहावे अशा प्रयत्नांना सुरुवात झाली आहे. पाणीप्रश्न मध्यवर्ती बनत चालल्याचे लक्ष आल्यावर शिवसेनेने पाणीपट्टीत ५० टक्के सवलत जाहीर केली. अन्य कोणत्याही शहरापेक्षा कमी दिवस पाणी मिळत असतानाही औरंगाबादकरांना ४०५० रुपये पाणीपट्टी भरावी लागत असे. ती आता दोन हजार रुपये करण्यात आली आहे. पाणीपट्टी कमी केल्यामुळे शिवसेनेवर असणारा रोष काही प्रमाणात का होईना कमी होईल, असे वातावरण निर्माण केले जात आहे. शिवसेनेच्या पाणीपट्टी कमी करण्याच्या धोरणालाही विरोध केला जात आहे. जेवढे दिवस पाणी तेवढीच पाणीपट्टी या न्यायाने महापालिका प्रशासन आणि सरकार वागले तर वर्षांला केवळ ६०० रुपये एवढीच रक्कम आकारता येईल आणि तेवढीच आकारली जावी, अशी मागणी भाजपच्या वतीने मोर्चाद्वारे केली जाणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. त्यामुळे ध्रुवीकरण अधिक पाणी या सूत्राने भाजप महापालिकेच्या निवडणूक प्रचाराला आकार देत असल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Handa morcha in aurangabad under the leadership of devendra fadnavis zws

Next Story
औरंगाबादला जूनमध्ये भाजपची बैठक ; अमित शहा यांची उपस्थिती
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी