छत्रपती संभाजीनगर : गुलाबी रंगाचा शर्ट आणि उन्हापासून संरक्षणासाठी डोक्याला बांधलेला पांढरा रुमाल गुंडाळून ‘नीट’ मध्ये ५१५ गुण मिळवून वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झालेला हरिओम आता सोयाबीनच्या शेतात मजुरी करत आहे. लोहा तालुक्यातील खडकमांजरीमधील वारकड कुटुंबीयांसमोर मुलाला शिकवण्याचे मोठे आव्हान उभे आहे. एका वर्षाचे शुल्क सव्वा सहा लाख रुपये आणि रोजची मजुरी ३०० रुपये. भाजीपाला विकणारे हरिओमचे वडील आता बँकेच्या कर्जासाठी उंबरठे झिजवत आहेत. दुष्काळी पट्ट्यातील आणि कष्टाने शेतीशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांचे आयुष्य किती खडतर असते, याचे हे उदाहरण.

खडकमांजरी हे दीड हजार लोकसंख्येचे गाव. या गावात २० गुंठे जमीन असणारे माधव वारकड यांना दोन मुले आहेत – हरिओम आणि मारुती अशी दोघांची नावे. हरिओम हुशार असल्याने कष्ट करून त्याला परभणीत शिकवणी लावली. हरिओमने यश मिळवले. ‘नीट’ च्या परीक्षेत ५१५ गुण मिळाल्यानंतर संपूर्ण घराला आनंद झाला. पण जसजसे वैद्यकीय शिक्षणाच्या शुल्काचे आकडे समोर येऊ लागले, तसतसे माधव वारकड हैराण झाले.

आपला मुलगा डॉक्टर होऊ शकतो, हे कळल्यापासून कर्ज घेण्यासाठी ते रोज बँकेचे चकरा मारू लागले आहेत. २५ लाखांपर्यंतची तजवीज होईल का, हे त्यांना माहीत नाही. हरिओम मात्र आईबरोबर सोयाबीन काढण्याच्या कामासाठी मजूर म्हणून बाहेर पडला. गावातील गजानन कापसे यांच्या शेतातील सोयाबीन काढणीचे काम एकमुश्त रकमेवर त्याच्या आईने घेतले आहे. चार महिला आणि हरिओमची आई दिवसभर शेतात वाळलेले सोयाबीन काढून टाकण्याच्या कामात मजूर म्हणून काम करत आहेत. किती रुपये मिळतील माहीत नाही, पण जगायचे असेल तर मजुरी करण्याशिवाय पर्याय नाही.

५१५ गुण मिळाल्यानंतर परभणीच्या वैद्यकीय महाविद्यालयात हरिओम वारकड प्रवेशासाठी पात्र झाला. शैक्षणिक शुल्क चार लाख ७९ हजार, वसतिगृहाचे शुल्क एक लाख ८० हजार, खानावळीचा खर्च एक लाख पाच हजार याशिवाय अनामत रक्कम असा खर्च समोर आला आहे. आता कोणी मदत केली तरच हरिओमचे शिक्षण होईल. वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या वर्षी शुल्क आणि वसतिगृहाचे शुल्क भरणे आवश्यकच आहे.

दुसरा भाऊ आता १२ वीला शिकत आहे. त्याला परभणीला किमान पाच हजार रुपये पाठवावे लागत आहेत. माधव वारकड आणि त्यांच्या पत्नीची ओढाताण टोकाला पोहोचली आहे. अजून तरी कोणी मदतीचा हात पुढे केला नाही. भर उन्हात मजुरी करताना हरिओम म्हणाला, ‘काही मुलांसाठी तरी फीमध्ये सवलत मिळायला हवी, पण कोणी लक्ष देत नाही.’ या मुलाच्या शिक्षणासाठी काही जणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले जात आहे. अधिक मदतीसाठी माधव वारकड यांच्याशी ७७२१०३२८२५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.