नांदेड :  विद्यार्थिदशेतच समाजवाद, गांधीवादाचे संस्कार घेतलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना या पदावरून हटविण्याच्या मागणीसाठी त्यांचा अभाविपशी संबंध जोडणार्‍या काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाला त्यांच्या निवेदनातील याबाबतच्या मुद्यावरून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी खडसावल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर हा मुद्दा बातमीत घेऊ नका, अशी विनवणी याच शिष्टमंडळातील एका प्रतिनिधीस करावी लागली.

महाराष्ट्र काँग्रेस पक्षात अलीकडे बहुतांश जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका झाल्या. तत्पूर्वी पक्षाने एक वेगळा प्रयोग केला; पण त्यानंतर नांदेड, परभणी तसेच काही जिल्ह्यांमध्ये संधी न मिळालेल्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करून सपकाळ यांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. माजी राज्यमंत्री अनिल पटेल, रमेश बागवे, बुलढाणा जिल्ह्यातील संजय राठोड, परभणीचे माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार नामदेव पवार प्रभृतींनी सोमवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना प्रत्यक्ष भेटून ‘सपकाळ हटाव’चा आग्रह धरला.

वरील शिष्टमंडळाने पक्षनेत्यांना सविस्तर निवेदन सादर केले. त्यात सपकाळ यांची कार्यशैली, त्यांचे वेगवेगळे निर्णय, त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये पक्षाची होत असलेली घसरण इत्यादी मुद्यांसोबत सपकाळ हे काँग्रेस पक्षामध्ये येण्यापूर्वी अ.भा.विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. तेव्हा त्यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर प्रखर टीका केली, असे नमूद करण्यात आले. पण खरगे यांनी या मुद्यावर नापसंती व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. दिल्लीमध्ये गेलेल्या काही उत्साही काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या या मोहिमेची माहिती ठिकठिकाणच्या माध्यम प्रतिनिधींना सोमवारी सायंकाळीच कळविली. या शिष्टमंडळात नांदेडचे बालाजी चव्हाण आहेत. खरगे यांच्या भेटीनंतर ‘पटेल अ‍ॅन्ड कंपनी’ पक्षनेते खा.राहुल गांधी यांना भेटण्याच्या प्रयत्नात आहेत, असे सांगण्यात आले.

खरगे यांच्याशी व्यवस्थित चर्चा झाली, त्यांनी आमचे निवेदन बारकाईने वाचले, असे खुद्द अनिल पटेल यांनी मंगळवारी सांगितले. पण शिष्टमंडळातील एका प्रमुख कार्यकर्त्याने ‘सपकाळ आणि अ.भा.वि.प.’ असा जो निवेदनात उल्लेख आहे, तो छापू नका अशी विनंती पत्रकारांना केली. वरील बाब खरगे यांना आवडली नाही, हेही याच कार्यकर्त्याने स्पष्ट केले.

काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्षांच्या नेमणुका झाल्यानंतर जिल्ह्यातील एक चमू नाराज झाला. त्यांतील काहींनी मध्यंतरी दिल्लीमध्ये धाव घेतली होती. त्यानंतर पटेल व बागवे या माजी मंत्र्यांनी सपकाळ हटाव मोहीम सुरू केल्याचे समोर आले आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसच्या एका चमूकडून सपकाळ यांच्या विरोधात मोहीम सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी वारंवार प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही; पण सपकाळ यांना त्यांच्या तरुण वयापासून ओळखणार्‍या विविध क्षेत्रांतील जाणकारांनी सपकाळ कधीच अ.भा.वि.प.शी संबंधित नसावेत, असे सांगितले.

युवक असल्यापासून काँग्रेसमध्ये!

खरेखुरे आयडॉल्स (भाग-३) या पुस्तकामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सविस्तर लेख प्रकाशित झाला आहे. त्यात त्यांची पार्श्वभूमी तसेच त्यांची जडणघडण कशी झाली, हे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थिदशेपासून त्यांच्यावर समाजवादी विचारांचा प्रभाव पडला. त्यांच्या मातोश्री महिला काँग्रेसमध्ये सक्रिय होत्या. महाविद्यालयीन जीवनापासून ते युवक काँग्रेसमध्ये कार्यरत होते, असे लेखात म्हटले आहे. विशेष म्हणजे सपकाळ यांचा विवाह नांदेडमधील वर्षा जाधव यांच्याशी झालेला आहे.