सूर्यनारायण आग ओकू लागला असून जिल्ह्य़ात तापमानाचा पारा ४२ अंशांच्याही पुढे गेला आहे. त्यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवत असून एप्रिलच्या पहिल्या पंधरवडय़ात तीन जणांचा उष्माघाताने बळी गेला.
जिल्ह्य़ात दरवर्षीच उन्हाचा कडाका प्रचंड असतो. ४४ अंशांच्याही पुढे तापमानाचा पारा जातो; परंतु यंदाचा उन्हाळा अतिशय खडतर असल्याच्या प्रतिक्रिया आहेत. सलग दोन वर्षे सरासरीच्या अध्र्यापेक्षाही कमी पाऊस झाल्याने उष्णतेचा दाह प्रचंड तीव्रपणे जाणवत आहे. सकाळी नऊपासून ऊन भाजून काढू लागले आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत शक्यतो बाहेर पडून अंगमेहनतीची कामे करू नयेत, असा डॉक्टरांचा सल्ला आहे. परंतु श्रमिक व हातावर पोट असणाऱ्या मोठय़ा वर्गाला उन्हातही बाहेर पडून करावेच लागते. तसेच खरीप हंगाम तोंडावर असल्याने गाव-शिवारातही शेतीशी संबंधित कामे सुरू झाली आहेत. जूनपूर्वी शेत पेरणीस सज्ज करण्याची शेतकरी-शेतमजुरांची धडपड असून रणरणत्या उन्हात कामे केली जात आहेत. परिणामी आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत.
शाळांना सुटय़ा लागल्या असल्या, तरी केंद्रीय बोर्डाचा अभ्यासक्रम असणाऱ्या शाळा सुरूच आहेत. त्यामुळे ताप, अंगदुखी, टॉयफाइड अशा आजारांना मुले बळी पडताना दिसतात. शहरातील सर्व रुग्णालयांत तुंबळ गर्दी पाहायला मिळते. १ ते १५ वर्षे वयोगटातील तापेच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. लग्नसराईमुळे दिवसभर बाजारपेठ उघडीच राहत असली, तरी रस्त्यावर वर्दळ मात्र नाममात्र दिसून येते. एप्रिलच्या सुरुवातीच्या १५ दिवसांत तीन जणांचा उष्माघाताने बळी घेतला. यात दोन शेतकरी तर एका शाळकरी मुलाचा समावेश आहे.
सरसम (तालुका हिमायतनगर) येथे इयत्ता तिसरीत शिकणारा मुलगा प्रणव जगदीश मिराशे (वय ९) दुपारी चारच्या सुमारास खेळत असताना अचानक जमिनीवर कोसळला. त्यात त्याचा मृत्यू झाला. ११ एप्रिलला नाव्हा (तालुका हदगाव) येथील शेतकरी मारुती मात्रे शेतात काम करीत असताना उन्हाच्या तीव्रतेने चक्कर येऊन कोसळला आणि जागेवरच मरण पावला. १५ एप्रिल रोजी किनवट येथे गोविंद बुधाजी माळी (वय ६५) हा शेतकरी शेतात काम करीत असताना मळमळ ते डोकेदुखीमुळे बेजार झाला. शेजारी शेतकऱ्याने घरी जाऊन आराम करण्यास सांगितल्यानंतर तो घरी गेला; परंतु लगेच थोडे बरे वाटत असल्याने पुन्हा शेतात आला आणि अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला. अजूनही उन्हाची तीव्र लाट ओसरली नाही. भर उन्हात काम टाळणेच हिताचे असल्याचा डॉक्टरांचा सल्ला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heatstroke killed
First published on: 20-04-2016 at 03:28 IST