अतिवृष्टीने गणित बिघडले; क्षेत्रही घटले

बिपीन देशपांडे, लोकसत्ता

औरंगाबाद : कापूस उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रातील अनेक भागांना यंदा अतिवृष्टीचा फटका बसला आहे. त्याचा परिणाम देशपातळीवरील उत्पादित कापूस गाठींच्या साठय़ावर दिसणार आहे. यंदा उतारा अर्ध्यापेक्षाही कमी झालेला असल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत ४० लाख गाठी घटणार असल्याचा अंदाज जिनिंग असोसिएशन आणि सीसीआयकडूनही व्यक्त करण्यात आला आहे. अतिवृष्टी झालेल्या भागात एकरी सात ते आठ क्विंटल कापूस निघण्याऐवजी जेमतेम २ ते ४ क्विंटलचाच उतारा मिळत आहे. गतवर्षी कापसावर झालेल्या बोंडअळीच्या हल्ल्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी लागवडीचे क्षेत्र कमीच ठेवले आहे.

भारतात कापसाचे दरवर्षी साधारण ३५० ते ३७५ लाख गाठींचे उत्पादन होते. यंदा मात्र, ३२० ते ३२५ लाख गाठींचेच उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याला प्रमुख यंदा घटलेले क्षेत्र आणि महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीचे कारण सांगितले जात आहे.

यंदा मराठवाडय़ातील ४४६ पैकी ३६१ महसूल मंडळात अतिवृष्टी झालेली आहे, तर मराठवाडय़ातील आठ जिल्ह्यात मिळून कापसाचे सरासरी १५ लाख ९४ हजार ३११.०८ हेक्टर क्षेत्र असताना जेमतेम ६ लाख १७ हजार ३२८.९८ हेक्टर क्षेत्रावरच कापूस लागवड झालेली आहे. लागवडीत टक्केवारीचा हा आकडा ३८.७२ एवढा आहे. गतवर्षी २०२० मध्ये औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड व जालना या तीन जिल्ह्यांत कापसाची लागवड ९९.७६ टक्के झालेली होती. या तीन जिल्ह्यातील मिळून सरासरी १० लाख ४१ हजार ९६९ हेक्टरपैकी १० लाख ३९ हजार ४४० हेक्टर क्षेत्रावर कापसाची पेरणी झालेली होती. यंदा या तीन जिल्ह्यांपैकी औरंगाबाद जिल्ह्यात २८.९०, जालन्यात ४३.८० तर बीडमध्ये ३१.८४ टक्के पेरणीचे क्षेत्र आहे.

अतिवृष्टीचा उत्पादनातही फटका बसल्याचे सांगितले जात आहे. माजलगाव येथील जिनिंगचे संचालक ओंकार खुर्पे यांनी सांगितले की, यंदा कापसाच्या उताऱ्यातही मोठी घट आहे. एकरी सात ते आठ क्विंटल जिथे कापूस अपेक्षित होता तिथे तीन ते चार क्विंटलने कापूस निघत आहे. म्हणजे उत्पादन अर्ध्यावरच आले आहे. अतिवृष्टीचा फटका दिसत आहे. देशभरात महाराष्ट्रातच अधिक कापूस उत्पादन होते.अद्याप म्हणावा तसा कापूस जिनिंगवर येत नाही. कामगारांना बसून पगार द्यावा लागत आहे. जिनिंगवर १५ नोव्हेंबपर्यंत ५० हजार क्विंटल कापूस येणे अपेक्षित होते. मात्र, यंदा जेमतेम १५ हजार क्विंटलपर्यंतच माल आला होता. सध्या ७ हजार ५०० ते ७ हजार ८०० रुपयांपर्यंत कापसाचा दर्जा पाहून दर दिला जातो आहे. डिसेंबर ते जानेवारीदरम्यान सीसीआयकडूनही खरेदी सुरू होईल. दर वाढतील, या अंदाजाने शेतकऱ्यांनी अद्याप कापूस बाजारात आणलेला नाही.

पावसामुळे एकरी दहा ते बारा क्विंटलचा उतारा निघायचा तिथे दीड ते दोनच क्विंटल कापूस निघत आहे. आता दहा हजार रुपये क्विंटलने भाव मिळाला तरी शेतकऱ्याला त्याचा उपयोग नाही. मजूर १२ रुपये किलो वेचणीसाठी घेत आहे. तेही नगदी पैसे द्यावे लागतात. ७०० रुपये बॅगप्रमाणे एकरी दोन बॅगा बियाणे लागते. सहा बॅग रासायनिक खत लागते. फवारणी, खुरपणीवर होणारा खर्च वेगळा. काय परवडणार आहे. गतवर्षी बोंड अळी पडल्यामुळे यंदा कापूस पेऱ्यासाठी शेतकऱ्यांमध्ये भीती होती. त्यामुळे यंदा पेरा कमी झाला. गतवर्षी बीटी बियाण्यांमध्ये कंपन्यांनी जिन्स कमी केले. परिणामी बोंडअळीच्या हल्ल्यात पीक तगले नाही.

विश्वांभर हाके, शेतकरी.

जिनिंग अ्सोसिएशन आणि सीसीआयने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार देशभरात यंदा ३२० ते ३२५ लाख गाठीच उत्पादन निघण्याचा अंदाज आहे. गतवर्षी हेच उत्पादन ३५० ते ३७५ लाख गाठींपर्यंत होते. ४० ते ५० लाख गाठींच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

ओंकार खुर्पे, जिनिंग संचालक, माजलगाव.