हिंगोली: येथील अनुराधा पतसंस्थेच्या ६.२७ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात अटक असलेल्या संस्थेचे अध्यक्ष अशोक कांबळे यांचा परभणी येथील कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. ३) दुपारी घडली. मागील सुमारे २० महिन्यांपासून ते न्यायालयीन कोठडीत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अशोक कांबळे यांनी अनुराधा पतसंस्था स्थापन करून ठेवीदारांना जास्त व्याजदराचे आमिष दाखवले होते. इतर संस्थांच्या तुलनेत १० ते १२ टक्के व्याज देण्याचे आश्वासन देत त्यांनी तब्बल ४०३८ ठेवीदारांकडून ६.२७ कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या. मात्र, मुदत संपल्यानंतरही ठेवीदारांना रक्कम परत करण्यात आली नाही.
यानंतर झालेल्या लेखापरीक्षणात अध्यक्ष व संचालक मंडळाने बनावट ठराव आणि खोट्या कर्जप्रकरणांच्या माध्यमातून निधीचा अपहार केल्याचे उघड झाले. हा गैरप्रकार डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडल्याचे तपासात समोर आले. प्रकरण उघडकीस आल्यानंतर ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.
या संदर्भात लेखापरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून ४ मे २०२४ रोजी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात कांबळे यांच्यासह १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. ९ ऑगस्ट २०२४ पासून कांबळे परभणी कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते.
दरम्यान, रविवारी दुपारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने कारागृह प्रशासनाने तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, पोलिसांनी काही दिवसांपूर्वी ठेवीदारांकडून कागदपत्रे मागवून रक्कम परत मिळण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र कांबळे यांच्या मृत्यूमुळे ठेवीदारांच्या पैशांच्या परतफेडीचा प्रश्न पुन्हा अनिश्चिततेत सापडला आहे.
