हिंगोली: हिंगोली–वाशीम मार्गावरील कनेरगाव नाका शिवारात ‘एक लाख रुपयांच्या बदल्यात अडीच लाख रुपये’ देण्याचे आमिष दाखवून बनावट नोटांच्या व्यवहाराचा प्रयत्न झाला. यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दोघांना बासंबा पोलिसांनी बुधवारी रात्री पाठलाग करून अटक केली. आरोपींच्या कारमधून ‘भारतीय बच्चोंकी बँक’ असे नमूद असलेली २.५० लाख रुपयांची बनावट नोटांची पुडके जप्त केली.
हिंगोली–वाशीम मार्गावरील कनेरगाव नाका येथे हा प्रकार उघडकीस आला. नांदेड जिल्ह्यातील लिंगापूर येथील अंतेश्वर भुसारे यांना खामगाव येथील लखन गोपाल बजाज व विजय प्रकाशसिंग ठाकूर यांनी संपर्क साधत एक लाख रुपयांच्या बदल्यात अडीच लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले होते. ठरल्याप्रमाणे भुसारे हे बुधवारी रात्री सुमारे ११ वाजता कनेरगाव नाका शिवारात पोहोचले. त्याचवेळी खामगावहून कारने आलेल्या आरोपींनी व्यवहार सुरू केला.
दरम्यान, या संशयास्पद हालचालींची माहिती बासंबा पोलिसांना मिळाल. पोलीस अधीक्षक निलाभ रोहन व अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास आडे यांच्या पथकाने सापळा रचला. पोलिसांचे वाहन दिसताच आरोपींनी कारला कट मारून पळण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्यांचे वाहन आडवले व त्यांना जेरबंद केले.
तपासणीदरम्यान कारमधून चार मोबाईल आणि पाचशे रुपयांच्या पाच बंडलांमध्ये एकूण २.५० लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटांवर ‘भारतीय बच्चोंकी बँक’ असा उल्लेख आढळून आला. याप्रकरणी बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी यापूर्वीही अशाच प्रकारे फसवणूक केल्याची शक्यता तपासली जात आहे.

