हिंगोली: जिल्ह्यात होणाऱ्या भूकंपामुळे सुमारे १०५ घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून भूकंप लहरी मोजण्याचे यंत्र बसविण्याची मागणी केली जात आहे. याशिवाय लोकसंवाद घडवून आणण्यासाठी एक प्रणाली विकसित करण्याचेही नियाेजन केले जात आहे.

गुरुवारी पहाटे झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हा राहुल गुप्ता यांनी औंढा नागनाथ व वसमत तालुक्यातील पांगरा शिंदेसह बाधित गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांनी नुकसानग्रस्त घरांची पाहणी करून ग्रामस्थांना धीर दिला. भूकंपामुळे औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथे २,आमदरी येथे ८, तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, धामणगाव, खंडाळा, सिरळी व राजवाडी या गावांतील ९५ अशा एकूण १०५ घरांना अंशतः नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. हिंगोली, कळमनुरी व सेनगाव तालुक्यात कोणतेही नुकसान झाले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी गुप्ता यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार आर्थिक मदत दिली जाईल, असे सांगत पात्र लाभार्थ्यांचे घरकुल योजनांचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले. भविष्यात भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करून घरकुलांची उभारणी करण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही ते म्हणाले. १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून प्रत्येक गावाने एक लाख रुपये राखीव ठेवावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

यानंतर झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत प्रत्येक गावात नागरिकांना तात्काळ इशारे देण्यासाठी पब्लिक ॲड्रेस सिस्टीम उभारणे, भूकंपग्रस्त परिसरात सिस्मो मशीन बसविण्याचे प्रस्ताव शासनाकडे पाठविणे तसेच आपत्ती सौम्यीकरणाच्या कामांचे बाजारभावानुसार सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.