हिंगोली : जिल्ह्यात शनिवारी वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे सकाळी ४.५, तर औढा नागनाथ तालुक्यातील गडाळा येथे ३.३ रिश्चर तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. वारंवार होणाऱ्या भूकंपामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. गेल्या सहा महिन्यात ३० पेक्षा अधिक भूकंप नोंदविण्यात आले आहेत. मात्र, केंद्र आणि राज्य शासनाकडून या भूकंपीय हालचालींच्या गांभीर्याने दखल घेतली जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वसमत, हिंगोली, कळमनुरी आणि औंढा नागनाथ या चार तालुक्यांत गेल्या सहा वर्षांत सुमारे ३० सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यातील चार धक्क्यांची तीव्रता ४.४ ते ४.७ रिश्चर स्केल एवढी होती. काही महिन्यांपूर्वी पांगरा शिंदे परिसरात ४.७ तीव्रतेच्या धक्क्यानंतर अवघ्या काही तासांत ३.६, ३.९ आणि ४.१ तीव्रतेचे धक्के नोंदविण्यात आले होते. त्यामुळे या परिसरातील भूगर्भीय हालचालींकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.

या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने वैज्ञानिक भूकंप सज्जता आराखडा तयार करण्याची घोषणा केली होती. भूकंपतज्ज्ञांची नियुक्ती, भूगर्भातील दोषरेषांचा अभ्यास, जोखीम नकाशे, इमारतींचे संरचनात्मक परीक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा उभारण्याचे नियोजनही जाहीर करण्यात आले. मात्र, या घोषणांनंतर प्रत्यक्षात किती काम झाले, याची माहिती ग्रामस्थांना उपलब्ध नाही.

दरम्यान, शनिवारी झालेल्या भूकंपात जीवितहानी किंवा नुकसान झाले नसल्याचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी स्पष्ट केले.अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे व औंढा नागनाथ तालुक्यातील गडाला येथे प्रत्येकी एक असे एकूण दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत यामध्ये कोणतीही जीवित्वाची हानी झालेली नाही. प्रशासन सज्ज असून कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी केले आहे.