हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात गेल्या गुरुवारी पहाटे सलग भूकंपाचे धक्के बसल्यानंतर त्यावरील चर्चा सुरू असतानाच शनिवारी (११ जुलै) रात्री ११.२६ वाजता पुन्हा ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली, वसमत आणि औंढा नागनाथ परिसरात असल्याची माहिती मिळाली.
धक्क्यापूर्वी भूगर्भातून गूढ आवाज आल्याचे अनेक नागरिकांनी सांगितल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक जण घराबाहेर धावून आले. गेल्या गुरुवारी बसलेल्या धक्क्यांमुळे नागरिक आधीच धास्तावलेले असताना पुन्हा भूकंप झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नसल्याने प्रशासनाने दिलासा व्यक्त केला आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सतर्क राहावे आणि अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
