हिंगोली – शहरातील कपडागल्ली भागातील बासटवार यांच्या घरातील कृषी साहित्य व फटाक्याच्या साठ्याला सोमवारी रात्री आठच्या सुमारास अचानक आग लागली. या घटनेत ज्या घरात फटाक्यांचे गोदाम होते त्या मालकासह आग विझवण्यासाठी धावून आलेल्या तरुणाचाही मृत्यू झाला. आगीचे रौद्ररुप एवढे होते की, अग्निशमन दलाच्या बंबानेही पेट घेतला. यामध्ये तीन जवानही गंभीररीत्या भाजले. तर घटनेच्या घर व परिसरातील मिळून एका नगरसेवकासह आठ ते नऊ जणही ज्वाळांनी भाजून निघाले.

या घटनेतील मृतांची व भाजलेल्यांची नावे स्पष्ट होण्यासाठी तब्बल बारा तासांचा अवधी लागला. जखमींमधील दोन अग्निशमन जवानांना उपचारासाठी ३०० किमी अंतरावरील लातूर येथे तर बासटवार कुटुंबातील दोघांसह तिघांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे. या घटनेत अविनाश बांगर (वय ३५) व विजयकुमार बासटवार (७०) या दोघांचा मृत्यू झाला. विजयकुमार हे फटाक्यांचे ठोक विक्रेते असून, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या दोन मजली घरात कृषी साहित्याचे व फटाक्यांचा माल साठवून ठेवलेला होता. त्यांच्या घरातून रात्री अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच स्फोटाचे आवाज सुरू झाले.

आगीच्या लोळांनी अवघे अवकाश व्यापून निघाल्याने हिंगोली शहर हादरून गेले. मात्र, आग नेमकी कशी लागली, याचे कारण मंगळवारी दिवसभरात समोर येऊ शकले नाही. घटनेची माहिती मिळताच आमदार संतोष बांगर हे कार्यकर्त्यांसह दाखल झाले. तर अग्निशमन दलानेही शर्तीचे प्रयत्न केले. यामध्ये अग्निशमन दलाचे रवी कांबळे व आकाश सांगळे हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने लातूर येथे हलवण्यात आले. तर तिसरे कर्मचारी दिलीप दोडकेंवर हिंगोलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय मृत विजयकुमार यांचा मुलगा गोपाल बासटवार, त्याची पत्नी व भरत चौधरी-पहेलवान या तिघांना छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले. या आगीमध्ये अ्मित चौधरी, नगरसेवक कपिल खंडेलवाल, अनुप अग्रवाल, शैलेश नांदेडकर, कृष्णा बजरंग अग्रवालही भाजून जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही हिंगोलीतच उपचार सुरू आहेत.

आगीच्या घटनेची झळ बासटवार यांच्या निवासस्थानासमोर असलेल्यांनाही बसली आहे. यामध्ये शैलेश नांदेडकर यांच्या घरातील सर्व साहित्य कपडे लागते अन्नधान्य, दाग दागिने सर्व जळून खाक झाले. तसेच अंकित बगडिया यांचे घरही जाळून खाक झाले. राधेश्यामजी बोरा यांच्या घरापर्यंत आग पोहोचली होती. परिसरात ठेवलेल्या काही दुचाकी व सायकलीही जळाल्याने त्यांचा सांगाडा तेवढा उरला.

बळींनंतर प्रशासनाला जाग

हिंगोलीमध्ये भरवस्तीत सुरू असलेल्या फटाके विक्री आणि साठवणूक करणाऱ्या दुकानांचा प्रश्नही घटनेमुळे ऐरणीवर आला. दोघांचे बळी आणि पाचपेक्षा अधिक जण मृत्यूच्या दारात पोहोचल्यानंतर प्रशासनाला जाग आली असून, मंगळवारी दिवसभर फटाके विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे मारण्यात आले. यामध्ये हरीश अग्रवाल, शाहू फटाके विक्रेते, सुनील फटांगळे व नवीन फटांगळे यांच्या दुकानांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने विनापरवानगीने फटाक्यांचा साठा केल्याप्रकरणी छापे मारण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.