हिंगोली: कयाधू नदीवरील खरबी बंधाऱ्याचा वाद ताजा असतानाच, आता कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर शिवारात पूर्वी बांधण्यात आलेला बंधारा युद्धपातळीवर पाडण्याचे काम सुरू झाल्याने जिल्ह्यात नव्या वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे या बंधाऱ्यामुळे डोंगरगाव पूल गावाला दरवर्षी पुराचा वेढा बसत असल्याचा दावा करून तोड करण्यात येत असताना, दुसरीकडे माजी खासदार अॅड. शिवाजी माने यांनी या निर्णयाला तीव्र विरोध करत जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीतून होणारा खर्चच चुकीचा असल्याचा आरोप केला आहे.
डोंगरगाव पूल गावालगतच्या जुन्या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी दरवाजे बसवून हा बंधारा उभारण्यात आला होता. प्रारंभी या बंधाऱ्यामुळे पाणी साठवण होऊन आसपासच्या दोन ते तीन गावांतील शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळाला. मात्र, कयाधू नदीला पूर आला की गावाला चारही बाजूंनी पाण्याचा वेढा बसत असल्याचे चित्र वारंवार निर्माण होत होते. या पार्श्वभूमीवर सरपंच गजानन देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा करत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांचे लक्ष वेधले.
आमदार संतोष बांगर यांच्या सूचनेनंतर आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बंधारा पाडण्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर होऊन कंत्राटदाराला काम देण्यात आल्याने सध्या बंधारा पाडण्याचे काम सुरू आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात डोंगरगाव पूल गाव पुराच्या धोक्यापासून मुक्त होईल, असा दावा ग्रामपंचायतीकडून करण्यात येत आहे.
मात्र,माजी खासदार शिवाजी माने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. गाव डोंगरावर वसलेले असताना पुराचा धोका नसल्याचा दावा करत, बंधारा तोडल्यास सिंचन पूर्णपणे बंद होईल आणि कयाधू नदीतील पाणी वाहून जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे हा बंधारा पाडण्याच्या कामाला तातडीने स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पूरमुक्ती आणि सिंचन यांमधील हा संघर्ष आता जिल्ह्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

