हिंगोली: ‘नीट’च्या फेर परीक्षेत पेपर अपेक्षेप्रमाणे न गेल्याच्या १८ वर्षाच्या विद्यार्थ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. सुशील विलास ढगे (वय १८, रा. अष्टविनायक नगर, हिंगोली) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

सुशील हा वैद्यकीय शिक्षण घेण्याचे स्वप्न बाळगून नीट परीक्षेची तयारी करीत होता. नुकतीच त्याने परीक्षा दिली होती. मात्र पेपर अवघड गेल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली होता. मंगळवारी रेल्वे संरक्षण भिंतीच्या परिसरातील एका विहिरीत त्याने उडी घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी २४ जून रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच हिंगोली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर व पोलिस अंमलदार एस. जी. अंभोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

या प्रकरणी प्रवेश भगवान वाढवे (रा. पिंपरखेड, ता. हिंगोली) यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या विद्यार्थ्याच्या भ्रमणध्वनीमध्ये शेवटचा संदेश ‘माफ कर मम्मी…’ असा होता. आत्महत्येपूर्वी सुशीलने आपल्या मोबाईलमध्ये एक भावनिक चलचित्रण नोंदवले. यात “मला माफ कर मम्मी… मी आत्महत्या करीत आहे. पुढच्या जन्मीही तुझ्याच पोटी जन्म घेईन. माझी काळजी करू नको,” असे म्हटले. या संदेशामुळे संपूर्ण परिसर हळहळला असून विद्यार्थ्यांवरील वाढत्या मानसिक तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.