हिंगोली; जिल्ह्यात गुरुवारी (९ जुलै) पहाटे एकापाठोपाठ चार वेळा भूकंपाचे धक्के बसल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाचे सौम्य धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्येही जाणवले. मात्र, दोन्ही जिल्ह्यांत कोणतीही जीवितहानी अथवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व द्यावे, असे आवाहन हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता आणि परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, पहिला भूकंप रात्री १.३७ वाजता हिंगोली जिल्ह्यातील पांगरा शिंदे परिसरात झाला. त्याची तीव्रता ४.८६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली. त्यानंतर २.१५ वाजता ३.६ रिश्टर, २.१७ वाजता ३.९ रिश्टर आणि पहाटे ३.२३ वाजता ४.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे आणखी तीन धक्के काकडधाबा परिसरात नोंदविण्यात आले.

दरम्यान, हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक माहितीनुसार भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर स्केल इतकी नोंदविण्यात आली असून केंद्रबिंदू वसमत तालुका परिसरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाने याबाबत पुढील तांत्रिक पडताळणी सुरू असल्याचे सांगितले आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के परभणी जिल्ह्यातील काही भागांमध्येही नागरिकांना जाणवले.

याबाबत नागरिकांनी दूरध्वनीद्वारे जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. मात्र, परभणी जिल्ह्यातही कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नसून प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना कोणत्याही अप्रमाणित संदेशांवर किंवा समाजमाध्यमांवर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

अधिकृत माहिती केवळ जिल्हा प्रशासन, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि शासनाच्या अधिकृत माध्यमांतूनच घ्यावी. तसेच समाजात भीती निर्माण होईल असे दिशाभूल करणारे संदेश प्रसारित किंवा पुढे पाठविणे टाळावे, असेही त्यांनी म्हटले आहे. परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनीही नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे.

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास स्थानिक प्रशासन, पोलीस, महसूल विभाग किंवा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाशी तातडीने संपर्क साधावा. तसेच भूकंपानंतर इमारतींना तडे, संरचनात्मक नुकसान किंवा इतर धोकादायक परिस्थिती आढळल्यास त्याची त्वरित माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दोन्ही जिल्हा प्रशासनांनी नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.