हिंगोली : शहरातील खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाखाली रेल्वेसमोर झेप घेत पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (ता. २९) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. अमोल गंगलवाड (वय ५०) असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्या मृत्यूमुळे हिंगोली जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगलवाड हे सुमारे दोन महिन्यांपूर्वी परभणी येथून बदलीने हिंगोली जिल्हा पोलिस दलात दाखल झाले होते. सध्या ते हिंगोली पोलिस दलाच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. शनिवारी सकाळी ते खटकाळी रेल्वे उड्डाणपुलाच्या परिसरात गेले. याचवेळी पूर्णा येथून अकोल्याच्या दिशेने जाणारी रेल्वे पुलाजवळ येताच त्यांनी अचानक रेल्वेसमोर झेप घेतली. रेल्वेच्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, त्यांनी पोलिस गणवेशातच हे टोकाचे पाऊल उचलले.
घटनेनंतर रेल्वेच्या लोकोपायलटने तत्काळ स्टेशन मास्तरांना माहिती दिली. स्टेशन मास्तरांनी हिंगोली पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपककुमार मस्के यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी पाहणी केली. यावेळी गंगलवाड यांचा मृतदेह आढळून आला.
कारणाचा शोध सुरू
गंगलवाड यांनी अचानक टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. त्यांच्या वैयक्तिक तसेच सेवेशी संबंधित बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगितले. गंगलवाड हे दोन महिन्यांपूर्वीच परभणीहून हिंगोलीत बदलीने आले होते आणि नियंत्रण कक्षात कार्यरत होते, अशी माहिती त्यांनी दिली.
