छत्रपती संभाजीनगर : हिंगोलीची मागास ओळख तशी खूप जुनी. ना-उद्योग जिल्हा, अशी शासकीय दप्तरी नोंद. पण हळदीने गेल्या वर्षभरात हिंगोलीचे रूप पालटले. जिल्ह्यातील १० स्वयंसाहाय्यता गटांनी १० प्रकारचे पदार्थ बनविले. पूर्वी फक्त हळदीचे कुंकू एवढेच माहीत. बाकी हळद औषधी. पण पुढे कुंकू बनविण्यासाठी चिंचोके वापरले जाऊ लागले. पण हळदीचा उपयोग  मर्यादित नाही हे लक्षात आले आणि ग्रामीण भागातील महिलांनी हळदीचे सरबत किंवा शहरी आणि इंग्रजी भाषेत ‘ टर्मरिक शॉट’, चेहर्‍याला लावण्याचे क्रीम, हळदीचे तेल, लोणचे असे पदार्थ बनवले. आता हिंगोली जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघुउद्योगाची नवी साखळी निर्माण होऊ लागली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हळदीचे पीक अधिक घेतले जाते. आता हळदीच्या पिकांचा पेराही वाढतो आहे. २०२३ मध्ये ३४१७ हेक्टरवर हळद होती. ती पुढे ३५ हजारवर गेली आणि गेल्या म्हणजे २०२५च्या खरीप हंगामात ही वाढ ३८०४६ हेक्टरवर गेली. हा एकूण लागवडीच्या १५ टक्के हिस्सा आहे. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या हळदीवर प्रक्रिया उद्योग नव्हते. आता त्यात भर टाकली जात आहे. वनिता अशोकराव दंडे यांनी पुढकार घेतलेल्या पूजा महिला बचत गटाने बरेच पदार्थ बनवण्यास सुरुवात केली.

करोनानंतर प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या हळदीने हिंगोलीचे रूप पालटत असल्याचे सांगण्यात येत आहे. या अनुषंगाने बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले, ‘या जिल्ह्यातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी हळद याच पिकाची ताकद ओळखून आम्ही पावले उचलत आहोत. २०२० मध्ये हळदीचे सरासरी दर ४ हजार ९५६ एवढे होते ते आता १३ हजार ३४८ एवढे झालेले आहेत. त्यामुळे हळदीच्या सरबतापासून ते हळदीची औषधे तयार करण्यापर्यंतची साखळी निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. अनेक लघुउद्योगांना चालना दिली आहे. मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेत गेल्या वर्षी ५१६ उद्योगांना परवानगी देण्यात आली होती. या वर्षी ७७३ उद्योग उघडले जातील, असे काम करतो आहोत.’

घरकुल योजनेमध्ये अग्रेसर

शासकीय सर्वेक्षणातील सर्व पात्र १६ हजार ८६५ लाभार्थ्यांना घरकुले मंजूर करण्यात आली. १५ हजार ९२६ घरकुले पूर्ण झाली आहेत. एखाद्या मागास आणि ना-उद्योग जिल्ह्यातील गरिबांना घरे देणार्‍या योजनेस गती दिल्याने अनेकांचे घराचे स्वप्न पूर्ण झाले. खरे तर गेल्या काही वर्षांत वाळूचे प्रश्न होते तसेच अनेकांना घरे बांधण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. पण दीनदयाल उपाध्याय योजनेतून जागाही मिळवून देण्यात आल्या. हा कार्यक्रम अधिक गतीमान करण्यात आल्याचे कार्यक्रम अधिकारी गणेश पाटील झाडे यांनी सांगितले. घरांच्या दुसर्‍या टप्प्यातील कामांनाही आता वेग देण्यात आला आहे. रस्ते, घरकुले आणि सूक्ष्म उद्योजकांना सोबत घेत जिल्हा निर्देशांकात प्रगती करण्यापर्यंत हिंगोली जिल्ह्याने प्रगती केल्याचे पाहणीमध्येही आढळून आले आहे.

संशोधन मात्र संथगतीने

’एका बाजूला हळदीचे फायदे आणि त्यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना दिली जात असताना हळद संशोधन केंद्राचे काम मात्र गेल्या काही महिन्यांपासून संथ गतीने सुरू होते. मंजूर निधी तांत्रिक बाबींमध्ये अडकून पडला. आता तो निधी मिळू लागला असल्याचे खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले.

’एका बाजूला हळदीच्या शक्तीसह ना-उद्योग जिल्ह्यात प्रगती होत असतानाच ग्रामीण भागातील रस्त्याच्या मंजुरीमध्येही हिंगोलीने पुढाकार घेतला आहे. मात्र, या रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्हे लावली जात आहेत.

हळदीच्या सरबतापासून ते हळदीच्या साबणापर्यंत अनेक पदार्थ बनवत आहोत. सुमारे पाच हजार साबण बनवता येतील, तर चेहर्‍याचे क्रीम बनिवण्यासाठी मोसंबी, संत्रा, मुळा यासह प्रमुख घटक हळद असणारे पदार्थही बनविले जात आहेत.- वनिता दंडे, पूजा स्वयंसहाय्यता गट

मुख्य प्रायोजक : सारस्वत  को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

सहप्रस्तुती :  संजय काकडे ग्रुप

सहप्रायोजक : व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज लिमिटेड, कमला ग्रुप

पॉवर्ड बाय :महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, महानिर्मिती

नॉलेज पार्टनर :  गोखले इ्स्टिटट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे</p>

डेटा पार्टनर : अर्थ व सांख्यिकी संचालनालय, महाराष्ट्र शासन