हिंगोली: जिल्ह्यासह मराठवाड्यातील हजारो हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारे संशोधन वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रात सुरू झाले आहे. गॅमा किरणांच्या साहाय्याने हळदीच्या कंदांमध्ये उपयुक्त जनुकीय बदल घडवून अधिक उत्पादन, उच्च कर्क्युमिन, उत्तम गुणवत्ता आणि रोग-कीड प्रतिकारशक्ती असलेले नवीन वाण विकसित करण्याच्या दिशेने हे संशोधन सुरू करण्यात आले आहे.

हळद उत्पादक पट्ट्यांपैकी एक असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भविष्यात अधिक उत्पादन देणारे आणि बदलत्या हवामानालाही तोंड देणारे हळदीचे वाण उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रात आधुनिक उत्परिवर्तन संवर्धन संशोधनाला प्रारंभ झाला आहे. केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या संशोधनात कोबाल्ट-६० या स्रोतापासून मिळणाऱ्या गॅमा किरणांच्या नियंत्रित मात्रांचा हळदीच्या विविध वाणांच्या कंदांवर वापर केला जात आहे. त्यानंतर या कंदांची लागवड करून उगवण क्षमता, वाढीचा वेग, जोम, जिवंत राहण्याचे प्रमाण तसेच इतर आकृतीबंधीय वैशिष्ट्यांचे वैज्ञानिक पद्धतीने निरीक्षण केले जात आहे.संशोधनाचा सध्याचा टप्पा योग्य विकिरण मात्रा निश्चित करण्याचा असून, पुढील पिढ्यांमध्ये उपयुक्त गुणधर्म असलेल्या रोपांची निवड केली जाणार आहे. त्यातून अधिक उत्पादन देणारे, उच्च कर्क्युमिनयुक्त, दर्जेदार आणि रोगप्रतिकारक हळदीचे नवीन वाण विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.

हे संशोधन यशस्वी झाल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास, रोगांमुळे होणारे नुकसान घटण्यास आणि बाजारपेठेत अधिक दर्जेदार हळद उपलब्ध होण्यास मदत होईल. परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संशोधनाचे नेतृत्व डॉ. सिद्धनाथ शेंडेकर व संशोधन सहयोगी नागेश दत्तगोंडे करीत असून, तंत्र अधिकारी रमेश देशमुख आणि कृषी पर्यवेक्षक रमाकांत भुरे क्षेत्रीय स्तरावर सहकार्य करीत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हळद लागवडीला नवी दिशा देणारे हे संशोधन शेतकऱ्यांसाठी आशादायी ठरेल, असा दावा केला जात आहे.