हिंगोली : वसमत तालुक्यातील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राने तयार केलेल्या दोन लाख रोपांच्या खरेदीसाठी नोंदणी झाली. त्यातील दीड लाख रोपे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी नेली आहेत. दीड महिन्याची तयार रोपे मिळत असल्यामुळे व्यवस्थापनाच्या खर्चात बचत होईल, असा दावा केला जात आहे.
राज्यात सर्वात जास्त हळदीचे उत्पादन हिंगोली जिल्ह्यात विशेषतः वसमत तालुक्यात घेतले जाते. त्यामुळे वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राला मान्यता देण्यात आली. मागील दोन वर्षांपासून या केंद्राच्या कामाला सुरुवात झाली आहे. या शिवाय या केंद्राच्या माध्यमातून राज्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांना हळदीचे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण वाण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.
दरम्यान, या केंद्रातून शेतकऱ्यांना तयार रोपे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मागील वर्षापासून प्रायोगिक तत्वावर रोपे तयार करण्यास सुरुवात केली. गेल्या वर्षी ५० हजार रोपे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. या वर्षी त्यात वाढ करण्यात आली.
सेलम या वाणासह फुले स्वरुपा, पीडीकेव्ही वायगाव, मेदूकर, एसबी १०८४३, रोमा, दुग्गीराला रेड, सुदर्शना या रोपांचा समावेश यामध्ये आहे. परंतु, सेलम हे वाण राज्यातील वातावरणाशी अनुकूल असल्याने या वाणांची मोठी मागणी आहे.
पुढील वर्षी रोपाची संख्या वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. किमान चार लाख रोपे तयार केली जातील. – हेमंत पाटील, आमदार.