हिंगोली: जिल्हा बँक निवडणुकीमध्ये कोण प्रतिनिधी पाठवायचा हे ठरविण्यासाठी बोलावण्यात आलेल्या वसमत तालुक्यातील टोकाई सहकारी साखर कारखान्याच्या बैठकीत गोंधळ झाला. परिणामी अध्यक्ष शिवाजी जाधव यांना बैठकीतून बाहेर जावे लागले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या २०२६-३१ या कालावधीमध्ये संचालक निवडणुकीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रतिनिधी ठराव मंजूर करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, ९ एप्रिलला नोटीस काढून अवघ्या तीन दिवसांत बैठक घेतल्याने नियमभंग झाल्याचा आरोप काही संचालकांनी केला. काही संचालक आक्रमक झाले. पुढे जिल्हा बँकेच्या प्रतिनिधी ठरविण्याचा विषय मागे पडला आणि कारखान्याच्या एकूण कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. भंगार विक्रीतील व्यवहार, कामगारांचे थकीत वेतन आणि कारखाना इतरांना चालवण्यासाठी केलेल्या करारावर एकमत नसल्याने वाद चांगलाच पेटला.
टोकाई कारखाना यापूर्वीही अशाच वादग्रस्त बैठकींमुळे चर्चेत राहिला आहे. संचालक आणि अध्यक्ष यांच्यातील मतभेद कायम राहिल्याने निर्णय प्रक्रियेलाच खीळ बसत असल्याचे स्पष्ट झाले आहे. गोंधळ वाढत असल्याचे पाहून अखेर कारखान्याचे अध्यक्ष ॲड. शिवाजी जाधव सभागृहातून काढता पाय घेतला. दरम्यान, संतप्त संचालकांनी प्रादेशिक साखर संचालकांकडे तक्रार दाखल करत चौकशीची मागणी केली आहे. आता प्रतिनिधी निवडीसाठी २२ एप्रिल रोजी पुन्हा बैठक बोलावण्यात आली आहे.
